मुक्तीधाम शेजारी असलेल्या गायकवाड मळा येथे वाळुजी संकुलमध्ये प्रमोद जाधव हे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. त्यांचा अठरा वर्षीय मुलगा तुषार जाधव हा मोबाइलवर ऑनलाइन ब्ल्यू व्हेल नावाचा गेम काही दिवसांपासून खेळत होत. या गेमच्या आहारी तुषार गेल्याचे समोर आले. तुषारने बुधवारी (दि.२९) राहत्या घरी एकटा असताना गेम खेळण्यास सुरुवात केली. या दरम्यान, तुषारने चक्क आपल्या दोन्ही मनगटांवर धारधार वस्तूने जखमा करून घेतल्या तसेच फिनाइलचे सेवन करत घरातच गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार त्याचे पालक घरी आल्यानंतर उघडकीस आला. जाधव कुटुंबीय संध्याकाळी जेव्हा घरी आले, तेव्हा घराचे दोन्ही दरवाजे बंद होते. त्यांनी घराची बेल वाजवली अन् दरवाजाही जोरजोराने ठोठावला. मात्र, आतमधून कुठलाही प्रतिसाद आला नाही. दरम्यान, प्रमोद जाधव यांनी दरवाजा तोडत घरात प्रवेश केला असता त्यांना तुषार गळफास घेतलेल्या मृतावस्थेत दिसून आला.
ऑनलाइन ब्ल्यू व्हेल खेळाच्या आहारी गेल्याने तुषार याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, या प्रकाराचा पुढील तपास उपनगर पोलिसांकडून केला जात आहे. भरवस्तीत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तुषारच्या मृत्यूने गायकवाड मळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यामुळे पुन्हा एकदा पालकांनी मुलांच्या मोबाइल वापरावर लक्ष केंद्रित करत आपली मुले नेमके कोणते मोबाइल गेम्स खेळत आहेत, हे वेळोवेळी तपासणे अत्यावश्यक असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.