पंचवटी : मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारात असलेल्या पूनम राजस्थानी ढाब्यासमोरील रस्त्यावर एका अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दिंडोरी तालुक्यातील लालपाडी जानोरी येथील १९वर्षीय युवकाचा मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले आहेत. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातील लालपाडी जानोरी येथील रहिवासी रवींद्र भाऊराव मोंढे हा रविवारी रात्री सव्वाबारा वाजेच्या सुमारास दुचाकीने ( क्र. एमएच१५एफ सी ०७५२) किशोर भास्कर बेंडकुळे, सूरज काशीनाथ बेंडकुळे (रा. ओझर टाऊनशिप, आंबेडकरनगर) यांना घेऊन आग्रारोडने ओझरकडे जात असताना समोर चालणार्या वाहनावर जाऊन धडकला. त्यात मोंढे यांच्या डोक्याला हाताला व पायाला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला, तर पाठीमागे बसलेले किशोर व सूरज बेंडकुळे हे दोघे जण जखमी झाले आहेत.