लाॅकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार गेले, काहींना कामावरून कमी करण्यात आले तर मोलमजुरी करणाऱ्यांच्याही रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे असे अनेक कामगार आपापल्या गावी परतले. या बेरोजगारांना रोजगार हमी योजनेवरील कामांनी आधार दिला आणि मोठ्या शहरातून गावात परतलेले तरुण रोजगार हमीच्या कामावर राबत आहेत. अर्थार्जनासाठी आपल्या कुटुंबाबरोबर शहरातून आलेले तरुण कुटुंबाला हातभार लावत असल्याचे चित्र जिल्ह्यातील अनेक भागात दिसून आले.
मागील वर्षीच्या आणि यंदाच्या रोहयोच्या कामात तफावत दिसत असली तरी यंदा रोजगार हमीच्या कामांना देखील फटका बसला आहे. निधीची तरतूद आणि वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाल्याने कामांवर निश्चित परिणाम झाला आहे. रोजगार हमीच्या कामात अनेक विभागांची कामे सुरू आहेत. यंदा नोव्हेंबरच्या कामात गेल्या वर्षीच्या तुलनेत फार तफावत दिसून येते. डिसेंबरच्या अखेरीस काही कामांमध्ये तसेच मजूर कुटुंबांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका आल्याने मजुरांची संख्यादेखील घटण्याची शक्यता निर्माण झाल्याने मजुरांना या कामावर टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाला देखील धावपळ करावी लागणार आहे.
--इन्फो--
आदिवासी भागात अनेक कामे
पारंपरिक आणि हंगामी शेती करणारे आदिवासी रोजीरोटीसाठी बाहेर पडतात. लाॅकडाऊनच्या काळात असे आदिवासी गावी परतल्याने हे लोक पुन्हा रोजगार हमीच्या कामावर परतले आहेत. जिल्ह्यातील कळवण, पेठ, बागलाण, सुरगाणा तसेच त्र्यंबकेश्वरच्या भागात रोजगार हमीच्या कामांची संख्या मेाठी असून, या कामांवर आदिवासी मजूर दिसून येतो. परगावातील मजूरही रोजगार हमीच्या कामावर दिसत आहेत.