नाशिक : माहिती तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात मेक इन इंडियाचे स्वप्न बघितले जात असताना स्मार्टफोन वापरणाऱ्या शहरातील चक्क डीजीपीनगर क्रमांक-१ मधील रहिवाशांना मात्र ‘नेटवर्क’ मिळविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. रस्त्यावर बसून रहिवाशी नेटवर्कची प्रतीक्षा करतानाचे चित्र या भागात पहावयास मिळत आहे. मोबाईल नेटवर्क पुरविणा-या सर्वच कंपन्यांच्या नावाने या भागात मोठी ओरड होत आहे.डीजीपीनगर क्रमांक-१ हा परिसर दुर्गम किंवा आदिवासी भागातील नाही तर जिल्हा परिषद कर्मचा-यांची सर्वात जुनी वसाहत व महापालिकेच्या आरोग्य सभापतींचे निवासस्थान असलेल्या हा परिसर नाशिक-पुणे महामार्गाला लागून आहे. डीजीपीनगर गृहनिर्माण संस्था ही सर्वात जुनी गृहनिर्माण संस्था म्हणून ओळखली जाते. या भागात मोबाईल कंपन्यांकडून नेटवर्क अत्यंत कमकुवतरित्या पुरविले जात असल्याने नागरिकांच्या नाकीनव आले आहे. याचा सर्वाधिक त्रास गृहिणींना सहन करावा लागत आहे. डीजीपीनगरच्या घरांमध्ये कुठल्याही कंपनीचे नेटवर्क अजिबात मिळत नाही. त्यामुळे जोपर्यंत उंबरा ओलांडून बाहेर येणार नाही, तोपर्यंत मोबाईल कंपन्यांचे नेटवर्कचे चिन्ह दिसत नाही. तुमचा स्मार्टफोन कितीही महागडा जरी असला व लेटेस्ट सिस्टम अपडेट वर्जन जरी असले तरी डीजीपीनगरमध्ये प्रवेश करताच जणू तुमच्या स्मार्टफोनच्या नेटवर्कला जणू आपोआप ‘जॅमर’ लागतो. मागील काही महिन्यांपासून ही समस्या मोठ्या स्वरुपात भेडसावत असल्याने डीजीपीनगरवासी त्रस्त झाले आहे.ज्या कंपनीचे सिमकार्ड वापरले जात आहेत, त्या कंपनीच्या ग्राहक सेवाअधिका-यांशी वारंवार संपर्क साधून रहिवाशांनी ही समस्या निदर्शनास आणून दिली आहे; मात्र कुठल्याही कंपनीकडून या समस्येवर अद्याप तोडगा काढण्यात आलेला नसल्याचे नागरिका सांगतात. एकूणच स्मार्टफोनवर संवाद साधणे डीजीपीनगरमधून जिकरीचे ठरत असल्यामुळे इंटरनेट वापर व त्यासाठी लागणारा ‘डेटा स्पीड’बाबत कल्पना न केलेली बरी.‘...अहो तुमचा फोनच लवकर लागत नाही’डीजीपीनगरवासीयांच्या कानी सध्या त्यांचे मित्र परिवार नातेवाईकांचे एकच वाक्य मागील काही दिवसांपासून पडत आहे. ते म्हणजे, ‘अहो, तुमचा फोनच लवकर लागत नाही’ हे वाक्य ऐकून येथील रहिवाशी त्रस्त झाले आहेत. जोपर्यंत मोबाईल घराच्या खिडकीमध्ये किंवा अंगणात घेऊन येत नाही, तोपर्यंत मोबाईलला रेंज येत नाही आणि संपर्कही होत नाही. मागील महिनाभरापेक्षा अधिक कालावधीपासून ही समस्या गंभीर बनली आहे.---अशोकामार्गावरही समस्याडीजीपीनगर क्रमांक-१पासून जवळ असलेल्या श्री.श्री.रविशंकर मार्गालगतच्या अशोका मार्ग परिसरातील घरांमध्येही मोबाईल नेटवर्कची समस्या मागील काही महिन्यांपासून प्रचंड भेडसावत असल्याने येथील नागरिकही वैतागले आहेत. नेमके कोणत्या कंपनीमध्ये पोर्टेबिलिटी करावी, हा येथील रहिवाशांपुढे सध्याचा यक्ष प्रश्न आहे, असे म्हणणे वावगे होणार नाही. अशोका मार्ग हा उच्चभ्रू वसाहत म्हणून उदयास आलेला परिसर आहे. या भागात मोठ्या संख्येने घरगुती प्रकल्प व रहिवाशी अपार्टमेंट आहेत. येथील फ्लॅटमध्ये मोबाईल नेटवर्क उपलब्ध होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पैसे भरुनही मोबाईल कं पन्यांकडून गलथान सेवा दिली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
जणू आपोआप ‘जॅमर’ : ‘नेटवर्क ’साठी डिजीपीनगरवासीयांची अंगणात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 2:36 PM
डीजीपीनगर क्रमांक-१ हा परिसर दुर्गम किंवा आदिवासी भागातील नाही तर जिल्हा परिषद कर्मचा-यांची सर्वात जुनी वसाहत व महापालिकेच्या आरोग्य सभापतींचे निवासस्थान असलेल्या हा परिसर नाशिक-पुणे महामार्गाला लागून आहे.
ठळक मुद्देमोबाईल कंपन्यांकडून नेटवर्क अत्यंत कमकुवत नेटवर्कला जणू आपोआप ‘जॅमर’ लागतो अशोकामार्गावरही समस्या नेमके कोणत्या कंपनीमध्ये पोर्टेबिलिटी करावी, हा रहिवाशांपुढे यक्ष प्रश्न