सिडको : महाविद्यालयास असलेल्या सुट्या व कुटुंबीय परगावी गेल्याची संधी साधून मित्रांसमवेत कश्यपी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या सिडकोतील वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि़६) सायंकाळच्या सुमारास घडली़ प्रशांत प्रभाकर तायडे (२०, फ्लॅट नंबर १३, चौथा मजला, श्री बालाजी पार्क, अभियंतानगर, कामटवाडा, सिडको) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून, सोमवारी (दि़७) त्याचा मृतदेह धरणातून बाहेर काढण्यात आला. ठाणे येथील वनपाल पदावर कार्यरत असलेले प्रभाकर तायडे यांचा मुलगा प्रशांत हा पाटीलनगर येथील गार्गी इन्स्टिट्यूट आॅफ वाइन टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात बीएससीच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होता़ सध्या महाविद्यालयास सुट्या असल्याने रविवारी मित्रांसमवेत कश्यपी धरणात स्नानासाठी गेला होता़ तर त्याचा परिवार नातेवाइकाच्या विवाहासाठी जळगावला गेला होता़ कश्यपी धरणात स्नान करीत असताना तो पाण्यात बुडाला व त्याचा मृत्यू झाला़ सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह शोधून काढण्यात पोलिसांना यश आले़ त्याच्या पश्चात वडील, आई, लहान भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे़तायडे कुटुंब हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील असून गत वीस वर्षांपासून ते सिडकोचे रहिवासी आहेत़
सिडकोतील तरुणाचा कश्यपी धरणात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 1:07 AM