लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गांधी परिवाराची एसपीजी सुरक्षा व्यवस्था काढल्याच्या निषेधार्थ युवक कॉँग्रेसच्या वतीने शनिवारी केंद्र सरकारच्या निषेधार्थ विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करून गांधी परिवाराला पूर्वीप्रमाणे सुरक्षिततेसाठी एसपीजी सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.
दुपारी १२ वाजता नाशिकरोड उड्डाणपुलाखाली जमून युवक कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी तसेच फलक फडकावून सरकारचा निषेध नोंदविला. त्यानंतर शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना मागणीचे निवेदन सादर केले. त्यात म्हटलं आहे की, देशासाठी ज्या परिवारातील दोन माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी आणि स्व. राजीव गांधी यांची हत्या झाली आणि संपूर्ण गांधी परिवार हा दहशतवाद्यांच्या, विविध देशद्रोही संघटनांच्या हिट लिस्टवर असतानादेखील केंद्र सरकारने अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची अतिविशेष सुरक्षा एसपीजी काढून सुडाचे राजकारण केले आहे. गांधी परिवाराच्या जीविताला असलेला धोका लक्षात घेऊन त्यांना पुन्हा एसपीजी सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसे न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील, शहर काँग्रेस अध्यक्ष शरद आहेर, डॉ. हेमलता पाटील, ज्ञानेश्वर गायकवाड, राहुल दिवे, भास्कर गुंजाळ, रईस शेख, हनीफ बशीर, सुनील आव्हाड, उद्धव पवार, दिनेश निकाळे, किरण जाधव, अनिल बहोत, भरत पाटील, गौरव पानगव्हाने, भास्कर गुंजाळ आदी सहभागी झाले होते.