लोहोणेर : येथील एक अठरा वर्षीय युवक मित्रसोबत गिरणा नदीपात्रात पोहण्यासाठी गेला असता पाण्यात बुडून मरण पावल्याची घटना शनिवारी (दि.२५) लोहोणेर गावात घडली. साहिल भगवंत देशमुख असे मयत युवकाचे नाव आहे. या संदर्भात देवळा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, साहिल त्याच्या मित्रासमवेत गिरणा नदीपात्रात अंघोळीसाठी गेला होता. साहिल खोल पाण्यात गेल्याने अचानक पाण्यात बुडाल्याचे नदीपात्रालगत असलेल्या शेतकरी तरुणानी पाहिले. त्याला पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढले. त्यास लोहोणेर येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश निकुंभ यांनी तपासून त्यास तत्काळ देवळा येथील ग्रामीण रु ग्णालयात हलविले. तेथे ग्रामीण रु ग्णालयाचे अधीक्षक डॉ. जे. एस. कांबळे यांनी उपचार केले, मात्र उपचारादरम्यान साहिलची प्राणज्योत मालवली. साहिलने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. त्याचे वडील रिक्षाचालक असून, आई आशा सेविका आहे. त्यास एक भाऊ आहे. देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी उशिरा साहिलवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 11:35 PM