नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा नाशिक विभागीय स्तरावरील युवक महोत्सव मंगळवार दि. १३ सप्टेंबर रोजी एचपीटी कॉलेज ेयेथे सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना या महोत्सवात सहभागी होता येणार आहे. शास्त्रीय वादन, उपशास्त्रीय गायन, सुगम गायन, लोकसंगीत, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, प्रश्नमंजूषा, वक्तृत्व, वादविवाद, काव्यवाचन, एकांकिका लघुनाटिका, नकला, स्थळचित्रण, कातरकाम, पोस्टर निर्मिती, मूर्तीकला, व्यंगचित्र, रांगोळी, छाया चित्रकला, रचना आदि विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांना सहभाग नोंदविता येणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी २५ वर्ष वयाची अट असून, विद्यार्थ्यांनी आपापल्या अभ्यासकेंद्रांमार्फत प्रवेश अर्ज दि. ९ सप्टेंबरपर्यंत मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्र, नवीन पंडित कॉलनी, शरणपूररोड, नाशिक येथे जमा करावीत, असे आवाहन सहायक कुलसचिव टी. के. सोनवणे यांनी केले आहे. मुक्त विद्यापीठाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या युवक महोत्सवाची तयारी करण्यात येत असून, महाविद्यालयात कामकाजाला सुरुवात झाली आहे. विविध कलाप्रकार सादर करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक नामवंत मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. (प्रतिनिधी)
मुक्त विद्यापीठाचा १३ सप्टेंबरपासून युवक महोत्सव
By admin | Published: August 29, 2016 1:08 AM