नाशिक : जीव रंगला असा..., ऐसा क्या गुनाह किया..., तेरे जैसा यार कहां... यांसारख्या हिंदी-मराठी गीतांचे सुमधुर गायन, वेस्टर्न सोलो नृत्य, समूह नृत्य आणि इंडो-वेस्टर्न फॅ शनचा जलवा अशा बहारदार सादरीकरणाला उत्स्फू र्त दाद देत ‘युथ फेस्टिव्हल’मध्ये तरुणाईने जल्लोष केला.नाशिक व्हिजनच्या वतीने भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात ‘युथ फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी साडेसहा वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात सूरज चव्हाण या युवा गायकाने ‘जीव रंगला असा...’ या मराठी गीताच्या सुमधुर गायनाने केली. त्यानंतर ‘संवार लूं...’ या गीताच्या सादरीकरणाला उपस्थितांनी हात उंचावून दाद दिली. त्यानंतर ‘ब्रेकिंग पॉइंट’ ग्रुपच्या वतीने वेस्टर्न सोलो नृत्य सादर करण्यात आले. तसेच ‘बॅड बॉईज’ ग्रुपने आगळे वेगळे असे ‘रक्तचरित्र’ समूहनृत्य सादर करून उपस्थितांना थक्क केले. पहिल्या फेरीत युवक-युवतींनी वेस्टर्न फॅशन शोचा जलवा दाखविताच सभागृह शिट्ट्यांनी दुमदुमून गेले होते. त्याचप्रमाणे दुसऱ्या फेरीत भारतीय पारंपरिक पोषाख परिधान करून तरुणाईने ‘रॅम्प वॉक’ करत उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळविली. प्रारंभी आयोजक नंदन भास्करे यांनी उपस्थित परीक्षक अलका अंबोरे, आदित्य निकम, तेजस्वी देसाई, हेमल ठक्कर यांचे स्वागत केले. कार्यक्रमाला परिसरातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘युथ फेस्टिव्हल’मध्ये तरुणाईने जल्लोष
By admin | Published: February 02, 2015 1:33 AM