‘आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचं काही देणं लागतं’ या विचाराने प्रेरित होऊन समाजाच्या फायद्यासाठी प्रयत्न करणारे काही ‘युवक’ मागील अनेक वर्षांपासून एकत्र आले आहे. या युवक मंडळाने गणेशोत्सवापुरतेच सामाजिक उपक्रम मर्यादित न ठेवता वर्षभर समाजभान ठेवून विविध समाजपयोगी उपक्रम राबविणारे मंडळ अशी ओळख मिळविली आहे. मागील अनेक वर्षांपासून जनजागृतीचा वसा घेत युवक मंडळ गणेशोत्सवास आकर्षक देखाव्यांच्या सादरीकरणाबरोबरच जनजागृतीवरही भर देत आहे. गेल्या वर्षी आरोग्यविषयक जनजागृती करत डेंग्यू, स्वाइन फ्लू या आजाराबाबत प्रबोधनाचा प्रयत्न केला होता. तसेच वर्षभर आरोग्य तपासणी शिबिर, नेत्रतपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, शालेय विद्यार्थी दत्तक योजना यांसारखे उपक्रमदेखील मंडळाकडून राबविले जातात. एकूणच समाजासाठी उपयोगी व प्रेरणादायी ठरणारे उपक्रम सदर मंडळ राबवित आहे. यावर्षी हेल्मेटविषयी जनजागृती मंडळाकडून गणेशोत्सवादरम्यान केली जात आहे. मंडळाचे दीडशे-दोनशे कार्यकर्ते असून, विविध समाजिक-सांस्कृतिक उत्सवांबरोबरच जयंती उत्सवांमध्येही स्वयंस्फूर्तीने सहभागी होतात.यावर्षी मंडळाने ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी ‘नो-डीजे’ असा विचार कृतीतून उतरविला आहे. त्यामुळे मुंबई नाका येथील मंडळाच्या गणेश आरासभोवती कुठलाही प्रकारचा डीजेचा दणदणाट कानी पडत नाही. भाविक शांतपणे सहन होईल इतक्या आवाजात भाव-भक्तिगीतांचा आनंद लुटत बाप्पांचे दर्शन घेतात.मिरवणुकीत ‘डीजे’ नसणारध्वनिप्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिकांसह मध्यमवयीन लोकांना, महिलांना होणारा त्रास लक्षात घेता युवक मित्रमंडळाने यावर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘डीजे’ मुक्त मंडळ म्हणून सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. समाजभान हे आपले प्रथम कर्तव्य असून, सण-उत्सव समाजाच्या विकासासाठी असतात त्यामुळे या औचित्यावर समाजाला कुठलाही त्रास होणार नाही, याचा विचार करून मिरवणुकीत आमचे मंडळ डीजेचा वापर करणार नसल्याचे मंडळाचे अध्यक्ष उपमहापौर प्रथमेश गिते यांनी सांगितले.
समाजभान जपणारे ‘युवक’ मित्रमंडळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:51 AM