शैलेश कर्पे, सिन्नर (नाशिक): तालुक्यातील गोंदे येथील ३२ वर्षीय ट्रकचालक युवकाचा अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. नाशिक-पुणे महामार्गाजवळ धोंडवीरनगर शिवारात अन्नपूर्णा हॉटेलजवळ युवकाचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी मयत युवकाची दुचाकी व छोटीसी तलवार आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
संपत रामनाथ तांबे (३२) रा. गोंदे ता. सिन्नर असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. गोंदे येथील संपत तांबे हा युवक ट्रकचालक असून तो अनेकदा बाहेरराज्यात ट्रक घेऊन जातो अशी माहिती पोलिसांनी दिली.
बुधवारी सव्वासात वाजेच्या सुमारास रात्री १०८ रुग्णवाहिकेला फोन आला. अपघातात जखमी झालेला युवक रस्त्याच्या कडेला पडलेला असल्याची माहिती मिळाल्यानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचली. नाशिक-पुणे महामार्गाजवळ सिन्नरबाजूकडे जाणाऱ्या रस्त्यावर सदर युवकाचा मृतदेह पडलेला होता.
घटनास्थळी एमआयडीसी पोलीस व सिन्नर पोलीस दोन्ही पोहचले. मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. तथापि, खून सिन्नर की एमआयडीसी पोलीस पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला यावरुन बराच वेळ चर्चा सुरु होती. वरिष्ठ अधिकाºयांच्या भेटीनंतर खूनाचा प्रकार सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी अर्जूनराव भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी भेट देऊन तपासकामी सूचना केल्या.
मयत संपत तांबे याच्या अंगावर धारधार शस्त्राने वार केल्याने घटनास्थळी रक्त सांडलेले दिसून येत होते. घटनास्थळी छोटीसी तलवारही पोलिसांना मिळून आली. याप्रकरणी मयत संपत तांबे यांचा भाऊ गणपत रामनाथ तांबे याने सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात खूनाची फिर्याद दिली. सिन्नर पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे अधिक तपास करीत आहेत. मयत संपत तांबे याच्या पश्चात आई, भाऊ आणि भाऊजई असा परिवार आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"