त्र्यंबकेश्वर : जामुंडे येथील जंगलात शनिवारी सकाळी गाई चारण्यासाठी गेलेल्या रमेश नवसु डोके या युवकावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये युवक गंभीर जखमी झाला. ही माहिती मिळताच त्यास त्वरित जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या डोळ्याला नाकाला, चेह-याला गंभीर जखमा झाल्या आहेत. जामुंडे येथील रमेश नवसु डोके हा युवक शनिवारी सकाळी गाई चारण्यासाठी जंगलात गेला होता. त्यावेळेस अचानक बिबट्याने हल्ला केला. डोके याला प्रतिकार करण्यास बिबट्याने वाव दिला नाही. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. या युवकाला पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या अधिक पाउस पडणा-या तालुक्यात घनदाट जंगलामुळे एकापेक्षा अधिक बिबट्यांचा वावर तालुक्यात आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात तर आतापर्यंत चाकोरे वावीहर्ष वाघेरा गणेशगाव हरसुल परिसरातील अनेक भागात शेती राखणीसाठी रानात गवताची खोपी घरे बांधतात. अशा वेळेस बिबट्यांनी शेळ्या, बक-या, कोंबड्या, गायी, गो-हे बिबट्याच्या भक्षस्थानी पडले आहेत.
बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 12:52 PM