वाडीव-हे (नाशिक) : इगतपुरी तालुक्यातील वाडिव-हे परिसरात गेल्या काही दिवसांत बिबटयांचा वावर वाढल्याचे दिसून येत असूनजाधववाडी रस्ता परिसरात शनिवारी सायंकाळी बिबट्याच्या हल्ल्यात एक शेतकरी युवक जखमी झाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली असून पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.
शनिवारी सांयंकाळी साडे सहा वाजता जाधव वाडी रस्त्यावर रमेश गवते यांच्या काकड़ीच्या शेतात त्यांचा मुलगा अमोल रमेश गवते (२४) हा ड्रीपला पाणी सोडून परतत असतांना शेतात दबा धरून बसलेल्या बिबटयाने अचानक त्याच्यावर हल्ला केला. आरडा ओरडा केल्याने बिबटया पळाला. यात अमोलच्या हाताला चावा घेतल्याने खोल जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार केले आहेत. चार महिन्यापुर्वी याच परिसरात बिबटयाने एका मजूरावर हल्ला केला होता.
परिसरात दोन पेक्षा जास्त बिबटे असल्याची माहिती शेतकरी देत आहेत. वाडीव-हे परिसरात मूकणे धरण वालदेवी धरण आणि वाडीव-हे लघु पाट बंधारा असे जलाशय असल्याने बिबटयांना पोषक वातावरण आहे. त्यामुळे या भागात बिबट्यांची संख्या लक्षणीय आहे. वाडी वस्तीवर,शेतात घरे बांधून राहणाऱ्या नागरिकांना नेहमीच बिबटया, तरस, कोल्हे नजरेला पड़त असतात, मात्र काही दिवसांपासून शेतकऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहेत.
दोन दिवसांपूर्वी शरद संपत कातोरे यांच्या शेतात काम करणाऱ्या मजूरावर बिबटयाने हल्ला केला होता, परंतु हातात कु-हाड असल्याने सुदैवाने तो वाचला. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असून वनविभागाने या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी दशरथ दिवटे, रमेश गवते,संपत कातोरे,रामदास गवते,गणपत दिवटे यांनी केली आहे.