जायखेडा- सोमपुर जायखेडा रस्त्यावरील लाडूद फाट्यावर स्कुलबसच्या धडकेने मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या मृत युवकाच्या नातेवाईकांनी रस्त्यावर तीन तास रास्ता रोको केल्यामुळे तणाव निर्माण झाला. बागलाण तालुक्यातील तांदुळवाडी येथील गणेश गुलाब भामरे (३०) हा युवक आपल्या मोटार सायकल क्र . एम. एच. ४१जी. ८९२२ ने जायखेडाकडे जात असताना त्याच्यापुढे चालत असलेली स्कुल बस क्र .एम. एच ४१ एच. १७० ने अचानक लाडूद फाट्यावर वळाली. या बसची जोराची धडक मोटारसायकलला बसली. त्यात गणेश भामरे जागीच ठार झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने लाडूद फाट्यावर जवळपास तीन तास रास्ता रोको केला. जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिष गावित, पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.मात्र संतप्त जमावाने बस मालकास घटनास्थळी बोलविण्याची मागणी केल्याने स्कुलबसवर दगड फेक करीत बसची तोडफोड केली. याचे मोबाईल मध्ये चित्रीकरण करीत असलेल्या साध्या वेशातील पोलीस निकेश कोळी या कर्मचाºयालाही यावेळी मारहाण करण्यात आली. सहकाºयांनी तातडीने हस्तक्षेप करीत पोलीस कर्मचाºयांची सुटका केली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने परिस्थिती नियंत्रनात आणण्यासाठी व संतप्त जमावास पांगविण्यासाठी पोलिसांना राज्य राखीव दलाची मदत घ्यावी लागली. या प्रकरणी जायखेडा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, बस चालकास ताब्यात घेण्यात आले आहे. मृत युवकाचे नामपुर ग्रामीण रु ग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन शोकाकुल वातावरनात अंत्यसंस्कार करण्यात आले. गणेश भामरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई वडील, भाऊ, असा परिवार आहे.
स्कुलबसच्या धडकेने युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 1:12 PM