- अझहर शेखनाशिक, दि. 28- धार्मिक पर्यटन स्थळ व प्रभू रामचंद्र यांचं वनवास काळातील वास्तव्य असलेल्या तपोवनमधील गोदावरी-कपिला संगम येथे धोकादायक लोखंडी पुलावरून काही तरुण जीवघेणा प्रवास करत असल्याचं बघायला मिळतं आहे. पुराच्या पाण्यामुळे दूरावस्था झालेल्या या पुलावरून प्रवास करून सेल्फी काढण्याचा प्रयत्नही या तरूणांकडून केला जातो आहे. त्यामुळे आधीच वाईट परिस्थितीत असलेला हा पूर कोसळून दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाउस सुरू असल्याने गोदावरीचा जलस्तर वाढला आहे. गंगापूर धरणामधून सातत्याने दोन हजार ते अडीच हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अशा परिस्थितीत लोखंडी पूल ओलांडला जात असल्याने धोका वाढला आहे. या पुलावर टाकलेल्या लाकडी वासे पावसाने ओले होऊन निसरडे बनले आहे. पुराच्या पाण्यात पुलाचे संरक्षक कठडे वाहून गेले आहेत. पोलिसांनी या ठिकाणी पुलाच्या प्रारंभी बॅरिकेड लावून बंद करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जाते आहे.