नांदगाव : लग्नाला अवघा एक महिना शिल्लक असतानाच, अपघातात नवरा मुलगा ठार झाल्याची दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. नांदगांव मनमाड रस्त्यावर हिसवळ बुद्रुक वळणावर टँकरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार व एक गंभीर जखमी झाला. याच रस्त्यावर टँकरच्या धडकेत १७ दिवसांत दोघांना जीव गमवावा लागला असून, तीन जणांना अपंगत्व आले आहे. अनियंत्रित वेगात धावणाऱ्या इंधन टँकरमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, त्यावर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.दुचाकी क्र. १५/एफ के ६०६१ हिस टँकरने धडक मारली. त्यात दुचाकीवरील जनार्दन सावळीराम वाघीरे (२२, रा.डाॅक्टरवाडी, ता नांदगांव) हा जागीच ठार झाला, तर अंकुश भागीनाथ डोळे (२५, जतपुरा ता.नांदगाव) गंभीर जखमी झाला. ठार झालेल्या जनार्दनचे फेब्रुवारी महिन्यात लग्न ठरले होते. तो सर्पदंशाने मयत झालेल्या काकांच्या दशक्रियेला डाॅक्टरवाडी येथे आला होता. तो व त्याचा मावसभाऊ अंकुश हे दोघे निफाड साखर कारखान्यावर कामाला चालले होते. दोघे ऊसतोड कामगार होते. रात्री उशिरा त्याच्यावर डाॅक्टरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
हिसवळ बुद्रुक वळणावर अपघातात युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 1:13 AM
लग्नाला अवघा एक महिना शिल्लक असतानाच, अपघातात नवरा मुलगा ठार झाल्याची दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
ठळक मुद्देनागरिकांत चिंता : अपघातांचे वाढते प्रमाण