नाशिकरोड : विभागीय आयुक्त कार्यालयातील भू-सुधार सहआयुक्त यांच्या कार्यालयात गोंधळ घालणाऱ्या सिन्नर तालुक्यातील युवकास पोलिसांनी अटक केली आहे. सिन्नर तहसील कार्यालयाच्या कामकाजाबरोबरच निफाड उपविभागीय अधिकाऱ्यांविषयी तक्रार करूनही प्रकरणाची सुनावणी का घेतली नाही, असे म्हणत विभागीय आयुक्त कार्यालयातील भू-सुधार सहआयुक्त उमेश महाजन यांच्या दालनात वडझिरे येथील युवक योगेश देवराम ठोंबरे याने गोंधळ घातला. महाजन यांच्या कार्यालयात येऊन त्याने अधिकाºयांविषयीच्या तक्रारीं-विषयी एकच गोंधळ घातला. यावेळी त्याने सिन्नर तहसील कार्यालयातील कारभार आणि निफाड उपविभागीय अधिकारी अर्चना पठाडे यांच्याबाबत अनेक आरोप केले. महाजन यांनी त्यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा आरडाओरडा सुरूच होता.सुनावणी का घेतली नाही असे म्हणत त्याने अधिकारी आणि कामकाजाविषयी अनेक आरोप केले. ठोंबरे याची समजूत काढण्यासाठी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाºयांनीदेखील प्रयत्न केले, मात्र तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. तुमच्या प्रकरणात विभागीय आयुक्तांनी निर्णय घेतला असून, त्याबाबत आपणाला कळविण्यात आल्याचे सांगूनही तो ऐकत नव्हता. अखेर त्यास विभागीय आयुक्तांकडे नेण्यात आले.आयुक्तांच्या दालनातही तो आरडाओरड करू लागल्याने अखेर नाशिकरोड पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतल्यानंतरही त्याचा गोंधळ सुरूच होता. ठोंबरे याच्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक करण्यात आली आहे. ठोंबरे याने सहा महिन्यांपूर्वीच विभागीय आयुक्त कार्यालयात विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचादेखील प्रयत्न केला होता.
विभागीय आयुक्त कार्यालयात युवकाचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 1:43 AM