नाशिक : मैत्री ही वर्षानुवर्षांची असते; मात्र या मैत्रीला व्यक्त करण्यासाठी निमित्त हवं असतं अन् ते निमित्त आॅगस्टच्या पहिल्या रविवारी (दि.६) तरुणाईने नेमकं साधलं...शहरातील विविध हॉटेल्स, मिसळ पॉइंट, उद्याने अन् पर्यटनस्थळी तरुणाईच्या मैत्रीला बहर आल्याचे चित्र पहावयास मिळाले.आपल्या मित्र-मैत्रिणींच्या मनगटावर मैत्रीची आठवण करून देणारे ‘बॅन्ड’ बांधत तरुणाईने औपचारिकता पूर्ण के ली अन् दिवसभर मित्र-मैत्रिणींसोबत धमाल करत जल्लोष केला. मैत्री दिनाचा मुहूर्त...रविवारची सुटी...नाशिकच्या मिसळ पॉइंटचा लळा... ‘दूधसागर’ धबधब्याची मोहिनी... तरुणाईमध्ये दिसून आली. तरुण-तरुणींचे समूह सकाळपासून सोमेश्वरजवळील ‘दूधसागर धबधबा’, गंगापूररोड, मखमलाबाद परिसरातील विविध मिसळ पॉइंट, गंगापूर धरण परिसर, पांडवलेणी, फाळके स्मारक परिसर, गोदा पार्क भागात तरुणाईच्या आनंदाला उधाण आले होते.गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग अत्यंत कमी स्वरूपात सुरू असल्यामुळे दूधसागर धबधब्याचा रुद्रावतार कमी झाला आहे. यामुळे तरुणाईने थेट येथील कातळामधील पायºया उतरून अगदी धबधब्याजवळ जाऊन मित्र-मैत्रिणींसोबत ‘सेल्फी क्लिक’ केल्या. महाविद्यालयीन जीवनातील हे क्षण आयुष्यभर तरुण-तरुणींच्या लक्षात राहतात. त्यामुळे प्राधान्याने आपल्या मैत्रीच्या आठवणींचा ठेवा जपण्याचा प्रयत्न मैत्री दिनाच्या निमित्ताने झाल्याचे दिसून आले. एकूणच मैत्री घट्ट करण्यासाठी तरुणाईकडून पुरेपूर प्रयत्न रविवारी झाला. रविवारचा पूर्ण दिवस तरुणांनी आपल्या मित्र-मैत्रिणींसाठी जणू ‘गिफ्ट’ केला की काय असेच चित्र कॉलेजरोड, गंगापूररोडसह परिसरातील पर्यटनस्थळांवर बघावयास मिळत होते. हॉटेल्स, सिनेमागृह, रेस्टॉरंट, स्वीट््स शॉप, गिफ्ट शॉपवर तरुणाईची गर्दी झाली होती. तरुणाईने मनमुरादपणे मैत्री दिनाचा आनंद लुटला.