मालेगाव : सोयगाव येथील मविप्र संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात मविप्र आयोजित यंदाच्या युवा स्पंदन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन संस्थेचे मालेगाव तालुका संचालक डॉ. जयंत पवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आर. के. बच्छाव होते.यावेळी डॉ. पवार म्हणाले, संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या कल्पनेतून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबर सांस्कृतिक कलागुणांचा विकास व्हावा या हेतूने ही स्पर्धा संस्था स्तरावर २०१२ पासून आयोजित केली जात आहे. या स्पर्धेत समूहगीत, लाइट व्होकल, क्लासिक व्होकल, ताल, क्लासिक स्वर, वेस्टर्न सोलो, वेस्टर्न ग्रुप, फोक आॅर्केस्ट्रा, एकांकिका, स्कीट, मिमिक्री, फोक डान्स, क्लासिक डान्स या चौदा कला प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. महाविद्यालयास युवा स्पंदन प्राथमिक फेरीचे केंद्र म्हणून आयोजन करण्याची प्रथमच संधी संस्थेनी दिल्याबद्दल आर. के. बच्छाव यांनी संस्थेचे आभार मानले. स्पर्धा दोन दिवस चालणार आहे. पहिल्या दिवसाच्या स्पर्धेत वरिष्ठ, कनिष्ठ व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आठ महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे जिल्हा समन्वयक मुंगसे आणि केटीएचएम महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. तुषार पाटील यांनी भेट दिली. मुंगसे यांनी जायखेडा शाळेतील पाचवीचा विद्यार्थी नवतेज चंद्रकांत खैरनार या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट तबला वाजविल्याने त्याचे कौतुक केले. प्राचार्य डॉ. एच. एम. क्षीरसागर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. परीक्षक म्हणून अतुल शिरसाठ होते. सूत्रसंचालन समन्वयक प्रा. देव सोनवणे, प्रा. डॉ. मनोज जगताप यांनी केले. आभार प्रा. युवराज शेवाळे यांनी मानले.
युवा स्पंदन प्राथमिक फेरीचे उद्घाटन मालेगाव : सोयगाव महाविद्यालयात कल्पकतेला वाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:17 PM