नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्व विभागांची गुणवत्ता यादी लवकरात लवकर जाहीर करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, आशा मागणीचे निवेदन युवासेनेच्या वतीने पुणे विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार यांना देण्यात आले.
युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई व युवासेना कार्यकारणी सदस्य रूपेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना विद्यापीठ कक्षाच्यावतीने सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ कक्षाच्यावतीने भेट घेतली व निवेदन देण्यात आले. या वेळी कुलसचिव यांनी आश्वासन दिले आहे की, दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व विभागांची गुणवत्ता यादी जाहीर करून प्रवेश प्रक्रियेस सुरवात केली जाईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अनेक विभागांमध्ये प्रवेशासाठी राज्यभरासह देशातील अनेक विद्यार्थी प्रवेशासाठी प्रयत्न करीत असतात. यंदाची प्रवेश प्रक्रिया विभागांमध्ये प्रवेश घेण्यासाठी वाट बघायची की अन्य महाविद्यालयांत प्रवेश घ्यायचा, या संभ्रमात विद्यार्थी पडलेला आहे. विद्यापीठातील गुणवत्ता यादीत नाव नसेल तर दोन्हीकडून संधी हुकल्यास वर्ष वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व विभागाची गुणवत्ता यादी लवकरात लवकर जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी निवेदनावर अध्यक्ष कुणाल धनवडे, सरचिटणीस परमेश्वर लाड, सचिव ज्ञानेश कोंढरे, उपाध्यक्ष विशाल हुलावळे, गणेश बर्वे, गणेश बनकर, रूपेश पालकर, सदस्य आकाश खारके, दीपक भोगे, शुभम साखरे, कल्पेश कदम आदी उपस्थित होते.