नाशिक : शिवसेनेने आता नव्या दमाच्या कार्यकर्त्यांबरोबरच युवतींची फळी देखील उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी प्रथमच नाशिकमध्ये संघटन उभे करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. २०) नाशिकमध्ये झालेल्या मुलाखतींना चांगला प्रतिसाद मिळाला असून, सुमारे तीनशे युवतींनी दिवसभरात शिवसेना कार्यालयात हजेरी लावली, असा दावा पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. या नव्या आघाडीमुळे भाजपच्या युवती आघाडीलाही टक्कर देण्याची तयारी शिवसेनेने आरंभली आहे.शिवसेनेत युवा सेना आहे, आता त्याच्या जोडीला युवती सेनेची फळी उभी करण्याचे निर्देश पक्षाचे नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने शनिवारी (दि. २०) नाशिकमध्ये युवती सेनेच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. मुलाखतीचा शुभारंभ युवती सेनेच्या उपसचिव आणि मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्य शीतल शेठ-देवरूखकर, शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, युवा सेनेचे संपर्क प्रमुख सिद्धेश शिंदे, माजी महानगर प्रमुख सचिन मराठे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.युवतींच्या भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी तसेच त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी युवती सेना स्थापन करण्यात आल्याचे भाऊसाहेब चौधरी यांनी यावेळी सांगितले तर युवती सेनेमुळे सर्व घटकांतील युवतींना नेतृत्व करण्याची संधी मिळणार असल्याचे शीतल शेठ-देवरूखकर यांनी सांगितले. नाशिक शहरातील चारही मतदार संघ तसेच सिन्नर, इगतपुरी अशा विविध भागांतील युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख दीपक दातीर, ग्रामीण जिल्हा प्रमुख राहुल ताजनपुरे, जिल्हा चिटणीस गणेश बर्वे, उपजिल्हा प्रमुख बलम शिरसाठ, रूपेश पालकर, पवन दातीर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.युवती सेनेत आलेल्या युवतींच्या मुलाखती घेताना अनेक प्रकारचे प्रश्न करण्यात आले. शिवसेनेलाच अग्रक्रम का दिला, आदित्य ठाकरे यांच्यासारख्या युवा नेतृत्वाकडून काय अपेक्षा आहेत, असे अनेक प्रश्न करण्यात आले.