दुर्घटनेच्या तीनच दिवस आधी श्रीमती रजनी काळे यांना झाकीर हुसेन रुग्णालयात कोरोनावरील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारदेखील व्यवस्थित सुरू होते. दुर्घटनेच्या दिवशी सकाळी ९.३० च्या सुमारास श्रीमती काळे यांच्या कन्येने आणलेला चहा आणि थोडासा नाश्तादेखील त्यांनी घेतला होता. मात्र, त्यानंतर काही वेळाने त्यांना श्वास लागल्याने ११ वाजेच्या सुमारास त्यांच्या कन्या आणि मुलाने हॉस्पिटल प्रशासनाकडे व्हेंटिलेटरची मागणी केली होती. मात्र, त्यांच्याकडे व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हते. व्हेंटिलेटर उपलब्ध झाल्यानंतर लावू, असे हॉस्पिटलच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे काही वेळाने व्हेंटिलेटर मिळेल, या अपेक्षेने त्यांचा मुलगा संदीप काळे आणि कन्या तेथून बाहेर गेल्यानंतर केव्हा तरी ऑक्सिजनगळती सुरू झाली. दरम्यान, हॉस्पिटल प्रशासनाकडून फोन आल्यानंतर ते तत्काळ हॉस्पिटलमध्ये पोहाेचले. मात्र, तोपर्यंत त्यांच्या आईचे निधन झाले होते. त्यामुळे काळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. सकाळी चहा घेताना दिसलेली त्यांची आई अवघ्या काही तासांत ऑक्सिजनअभावी मृत्युमुखी पडली होती. त्यानंतरच्या गतमहिनाभरात राज्य शासन आणि महानगरपालिकेने जाहीर केलेली प्रत्येकी ५ लाख याप्रमाणे १० लाखांची मदत त्यांना कागदपत्रे पूर्तता केल्यानंतर मिळाली आहे. मात्र, पंतप्रधान मदत निधीतून जाहीर करण्यात आलेली २ लाख रुपयांची मदत अद्याप त्यांना मिळालेली नाही.-------------------------
फोटोमागवलेला आहे.