नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात गेल्या बुधवारी (दि.२१) ऑक्सिजन टाकीला गळती लागण्याच्या दुर्घटनेनंतर आता या १३ केएल टाकीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. रविवारी (दि.२५) युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेल्या या कामामुळे रूग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी दोन पर्यायी टाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. हे काम सोमवारी (दि.२६) सायंकाळपर्यंत चालण्याची शक्यता आहे.गेल्या बुधवारी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी ऑक्सिजन रिफिल करताना गळती झाल्याने व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा कमी झाला आणि २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता, गेल्या ३१ मार्च रोजीच बसण्यात आलेल्या या टाकीच्या व्हॉल्व्ह अवघ्या २१ दिवसांत निकामी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते, तर टाकी बसवण्याबरोबरच देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराचे अधिकारी तब्बल ४८ तासांनी दाखल झाले होते. महापालिकेने पुण्यातील टायो निपॉन सान्सो कॉर्पोरेशनला काम दिले असून, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तंत्रज्ञ न ठेवल्याने महापालिकेला अन्य खासगी पुरवठादारांकडून तंत्रज्ञ मागवून दुरुस्ती करावी लागली होती. कंपनीचे अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी त्यांना टाकीची दुरुस्ती करण्याबरोबच तंत्रज्ञ नियुक्त करण्यास सांगितले होते. त्यानुसार कंपनीने काम सुरू केले आहे. त्यासाठी खास पुण्याहून तंत्रज्ञांचे पथक दाखल झाले आहे. रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी रविवारी (दि.२५) एकेक किलो लिटर्सच्या दोन टाक्या बसवण्यात आल्या आहेत. दोन टाक्या तात्पुरत्या टाकीच्या दुरुस्तीआधी तात्पुरत्या स्वरूपात दोन नव्या छोट्या टाक्या बसवल्या आहेत. त्यातून रुग्णालयात पुरवठा सुरळीत झाल्यानंतर मुख्य टाकीतील पुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल. सोमवारी (दि.२६) सायंकाळपर्यंत नव्या टाकीच्या दुरस्तीचे काम पूर्ण होईल, असे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
झाकीर हुसेन रुग्णालयात टाकीच्या दुरुस्तीचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 1:03 AM
महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात गेल्या बुधवारी (दि.२१) ऑक्सिजन टाकीला गळती लागण्याच्या दुर्घटनेनंतर आता या १३ केएल टाकीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. रविवारी (दि.२५) युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेल्या या कामामुळे रूग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी दोन पर्यायी टाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. हे काम सोमवारी (दि.२६) सायंकाळपर्यंत चालण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देतंत्रज्ञांची धावपळ : आज सायंकाळी होणार पूर्ण