नाशिक : शिक्षण संस्था चालकांकडून आठ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या अटकेप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने जिल्हा परिषद प्रशासनाला अहवाल सादर केला असून, या अहवालाच्या आधारे माध्यमिक शिक्षण विभागात घडलेल्या घटनेचा सविस्तर अहवाल प्रशासनाने राज्याचे अपर मुख्य सचिव व शिक्षण आयुक्तांकडे पाठविल्याचे वृत्त आहे. दरम्यान, लाच प्रकरणात मध्यस्थी करणारा प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यालाही प्रशासनाने शुक्रवारी (दि. १३) निलंबित केले आहे. मंगळवारी सायंकाळी जिल्हा परिषदेच्या आवारात ही घटना घडली होती. शैक्षणिक संस्थेचे मंजूर अनुदान अदा करण्याच्या मोबदल्यात आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताना माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांचा वाहनचालक ज्ञानेश्वर येवले व प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. झनकर यांच्या सांगण्यावरून ही रक्कम स्वीकारल्याची कबुली त्यांनी दिल्याने एसीबीने झनकर यांनाही ताब्यात घेतले, सुमारे सात तास चौकशी केल्यानंतर त्यांना घरी जाऊ देण्यात आले. मात्र तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणात झनकर या तीन दिवस फरार होत्या. शुक्रवारी (दि. १३) त्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला शरण आल्या व त्यांना अटक करून एक दिवसाची पोलीस कोठडीही देण्यात आली. या साऱ्या घटनाक्रमानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांचा सविस्तर अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला शुक्रवारी सादर केला आहे. दरम्यानच्या काळात राज्याच्या शिक्षण विभागानेही झनकर प्रकरणात शिक्षण उपसंचालकांकडून अहवाल मागविला आहे. या साऱ्या गोष्टींचा विचार करून जिल्हा परिषद प्रशासनाने पोलिसांच्या अहवालाच्या आधारे स्वत:चा नवीन अहवाल व प्रकरणातील वस्तुस्थिती दर्शक अहवाल राज्याच्या अपर मुख्य सचिव तसेच शिक्षण आयुक्तांना पाठविला आहे.
दरम्यान, झनकर प्रकरणात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचा शिक्षक पंकज दशपुते याला अटक करण्यात आल्याने व त्याला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेशही दिल्याने त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तसा प्रस्ताव शिक्षण विभागाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केला होता. शुक्रवारी प्रशासनाने निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. याच प्रकरणातील वाहनचालक ज्ञानेश्वर येवले हा शिक्षण विभागाचा असल्यामुळे त्याच्यावरही लवकरच शिक्षण विभागाकडून कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी बोलून दाखविली.