वायरिंगचे काम पूर्ण करण्याची मागणी
नाशिक : गंगापूर रोडवर केटीएचएम महाविद्यालयासमोर वायरींगच्या कामासाठी रस्त्यावर मोठा खड्डा करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे काम रखडले आहे. या खड्ड्यामुळे महाविद्यालयासमोर वाहतुकीची कोंंडी होत असून, पादचाऱ्यांना चालणेही गैरसोयीचे होत आहे. येथील काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
स्मार्ट रोडवरील पथदीप बंद
नाशिक : मोठा गाजावाजा करून तयार करण्यात आलेल्या शहरातील स्मार्ट रोडवर मेहेर सिग्नल ते अशोक दरम्यानच्या पथदीपांचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. यामुळे रात्रीच्या वेळी या परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरते. या मार्गावरील पथदीपांचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील रहिवाशांसह वाहनधारकांनी केली आहे.
व्दारका चौकात वाहतूककोंडी कायम
नाशिक : नेहमी गजबज असलेल्या शहरातील व्दारका चौकातील वाहतूककोंडीचा प्रश्न अद्याप कायम आहे. या चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली असली, तरी काही वेळी वाहनचालकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. चारही बाजूने येणाऱ्या वाहनांमुळे अनेक वेळा गोंधळ उडतो. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
चेंबरवरील ढापे खोल गेल्याने गैरसोय
नाशिक : शहरातील विविध मार्गांवर असलेल्या भूमिगत गटारींच्या चेंबरचे ढापे खाेल गेल्याने तेथे मोठा खड्डा तयार झाला आहे. अनेक वेळा वाहनचालकांना याचा अंदाज येत नसल्याने, वेगात असलेली वाहने या खड्ड्यांमध्ये आदळतात. यामुळे वाहनचालकांना इजा होण्याची शक्यता निर्माण होते. रात्रीच्या वेळी त्यात अधिक भर पडते. महापालिकेने याबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
रस्त्यावरील वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा
नाशिक : नाशिक रोड परिसरातील आशीर्वाद बसस्टॉपजवळ झालेल्या विविध बँकांमुळे या परिसरात वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अनेक नागरिक रस्त्यावरच चारचाकी वाहने उभी करीत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. जवळच गुरुद्वारा, बिटको महाविद्यालय असल्याने, या मार्गावर विद्यार्थ्यांचा नेहमी वावर असतो, याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे.
बेशिस्त वाहनचालकांमुळे अडथळा
नाशिक : नाशिक रोडच्या बिटको चौकातील सिग्नलजवळ अनेक वाहनचालक थांबत नाहीत. भरधाव वेगाने गाडी पुढे नेत असल्याने, अनेक वेळा वाहतूककोंडी होते. या चौकात अनेक ठिकाणी रस्त्यावर वाहने उभी केलेली असतात, त्याचाही अडथळा निर्माण होत असतो. याबाबत वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.