सायखेडा : नाशिक जिल्ह्यात हवामान बदलामुळे थंडीची लाट आली असून सर्वाधिक कमी तापमान निफाड तालुक्यात नोंदवले गेले आहे. तालुक्यातील गोदाकाठ भागातील,शिंगवे, करंजगाव, भुसे,चापडगाव,चांदोरी,नांदूर मध्यमेशवर या गावातील तापमान शून्यावर आल्याने सकाळी ऊसाचे पाचट, गवताची पाने यावरील दविबंदू गोठले होते तर काही भागात बर्फही साचलेला आढळून आला.शनिवारी (दि.९) पहाटे ३ अंश तापमानाची नोंद कुंदेवाडी येथील हवामान केंद्रावर झाली असली तरी गोदाकाठ भागात तापमान शून्यावर गेल्याने परिसरात हिमकणाची चादर पसरली आहे. काही दिवस उन्हामुळे वातावरणात बदल होऊन थंडी कमी झाली होती मात्र तीन दिवसांपासून पुन्हा थंडीने जोर धरला आहे. गोदावरी आणि कादवा नदीचे खोरे असल्याने पाणथळ परिसरात दव मोठ्या प्रमाणात तयार होते. थंडीत वाढ झाल्याने ऊसाचे पाचट, झाडाची पाने, शेतातील पिके, घराबाहेर लावलेली साधने यांच्यावर पडलेला दव गोठून त्याचा बर्फ तयार झाल्याचे दिसून आले. वाढत्या थंडीचा परिणाम द्राक्ष पिकावर होऊ लागला आहे. तालुक्यात सर्वात महत्त्वाचे नगदी पीक म्हणून द्राक्ष पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते मात्र वाढती थंडी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे. द्राक्ष मण्यांना तडे जाणे, फुगवण थांबणे, भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढणे, पाने पिवळी पडणे, वेलाची वाढ थांबणे, परिपक्व घडातील साखर कमी होणे अशा विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. वार्षिक एकदाच उत्पन्न देणारे पीक असल्याने मोठा खर्च झाला आहे. त्यात नैसर्गिक आपत्ती आल्यास मोठी आर्थिक हानी होऊ शकते, त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.
गोदाकाठ शून्य अंशावर, दवबिंदू गोठले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 3:39 PM
थंडीची लाट : निफाड तालुक्यात कमी तापमानाची नोंद
ठळक मुद्दे तालुक्यात सर्वात महत्त्वाचे नगदी पीक म्हणून द्राक्ष पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते मात्र वाढती थंडी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे.