नाशिक : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांनी सिन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून सलून दुकानदारांना वाटप केलेल्या खुर्ची खरेदीची प्रशासनाने चौकशी सुरू केली असून, ज्या ज्या दुकानदारांना खुर्चीचे वाटप करण्यात आले त्यांच्याकडून खुर्ची खरेदीचे अर्ज भरून घेण्याबरोबरच खुर्चीच्या तांत्रिक बाबींचीही तपासणी करण्यात येत आहे. जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार नाही तोपर्यंत लाभार्थींच्या खात्यावर पैसे जमा करणे रोखण्यात आले आहे.जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सिन्नरच्या सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी सदरचा मुद्दा उपस्थित केला होता. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून अध्यक्ष शीतल सांगळे यांनी सिन्नर तालुक्यातील सलून दुकानदारांना तेरा हजार रुपये किमतीच्या सलून खुर्च्या पुरविण्याची व्यक्तिगत लाभाची योजना राबविली होती. कोकाटे यांनी खुर्ची खरेदीसाठी जादा पैसे मोजण्याला आक्षेप घेत चौकशीची मागणी केली होती. त्यांच्या मते सलून दुकानदारांकडून पैसे घेऊन खुर्च्यांचे वाटप करण्यात आल्याचा आरोप होता. त्यानुसार प्रशासनाने या खुर्ची खरेदीची चौकशी सुरू केली आहे. मुळात सन २०१८-१९ या वर्षातील हा सेस फंड असून, त्याचा चालू वर्षी खुर्ची खरेदीसाठी वापर करण्यात आला असल्याने त्या खर्चाला मान्यता देण्याची बाब प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्याने तूर्त सलून दुकानदारांना डीबीटीमार्फत त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करणे थांबविण्यात आले आहे. हे करताना प्रत्येक लाभार्थीकडून छापील अर्ज भरून त्याने खुर्ची स्वत: खरेदी केल्याचे लिहून घेतले जात असून, याशिवाय लाभार्थीची स्वत:ची जागा आहे काय, दोनपेक्षा जास्त खुर्चीचा लाभ देण्यात आलेला आहे काय, जिल्हा परिषद सदस्याची शिफारस आहे काय, खुर्ची स्वत: खरेदी केल्याचे प्रमाणपत्र सादर केले काय, खुर्चीचा वापर केशकर्तनालयासाठीच केला जातो काय आदी बाबींची तपासणी करण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सध्या ८८ खुर्ची खरेदीचे प्रस्ताव प्रशासनाला प्राप्त झाले असून, या प्रस्तावांची छाननी करून त्याची सत्यता पडताळणीचे काम पूर्ण झाल्यानंतरच लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र चौधरी यांनी सांगितले.नाभिक समाज संघटनेकडून निषेधनाभिक समाज संघटनेने जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन दिले असून, त्यात म्हटले आहे की, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या संकल्पनेतून नाभिक समाजाला व्यवसायासाठी खुर्ची मिळाली आहे. परंतु जिल्हा परिषदेच्या सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी या खरेदीला आक्षेप घेऊन मोघम स्वरूपाचे आरोप केले आहेत. त्यांचे आरोप निव्वळ राजकीय विरोधातून व बदनामी करणारे असल्याने सर्व समाजबांधव त्यांचा जाहीर निषेध करीत आहे. कोकाटे यांनी जनतेसाठी किती व कोणत्या योजना दिल्या हे अगोदर जाहीर करावे व आमच्यासाठी असलेल्या योजनेवर आक्षेप घ्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. प्रशासनाने सदर खुर्च्यांचे पैसे लवकरात लवकर खात्यावर जमा करावेत, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या खुर्ची खरेदीची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 1:26 AM
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांनी सिन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून सलून दुकानदारांना वाटप केलेल्या खुर्ची खरेदीची प्रशासनाने चौकशी सुरू केली असून, ज्या ज्या दुकानदारांना खुर्चीचे वाटप करण्यात आले त्यांच्याकडून खुर्ची खरेदीचे अर्ज भरून घेण्याबरोबरच खुर्चीच्या तांत्रिक बाबींचीही तपासणी करण्यात येत आहे.
ठळक मुद्देप्रस्तावांची छाननी : तांत्रिक बाबींचीही तपासणी