नाशिक : विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीतच सर्वत्र दिवाळीची जोरदार तयारी सुरू आहे़ बहुतांश आस्थापनांमध्ये दिवाळीपूर्वीच बोनस, वेतन असे आशावादी चित्र असताना जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी देण्यात येणाऱ्या वेतनाबाबत प्रशासनाने मात्र कोणताही निर्णय न घेतल्याने अनिश्चितता निर्माण झाली आहे़ सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी आनंदात साजरी करता यावी, यासाठी दिवाळीपूर्वीच वेतन देण्याचा जिल्हा परिषदेत अलिखित नियम आहे़ याबाबत प्रशासन वित्त विभागाला महिनाभरापूर्वीच आदेश देते़ मात्र नुकत्याच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या व विषय समिती सभापतींच्या निवडणुका झाल्या आहेत़ त्यांची नव्याची नवलाई अजून सुरूच आहे, तर सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत या पदाधिकाऱ्यांसह अधिकारी व्यस्त आहेत़ दिवाळी अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली असतानाही अद्याप प्रशासनाकडून वेतनाबाबत काहीही हालचाल होताना दिसत नाही़ यामुळे पदाधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या दिवाळी वेतनाचा विसर पडला की काय अशी विचारणा कर्मचारी करत आहेत़ जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे मागील महिन्याचे वेतन अद्याप अदा करण्यात आलेले नाही, तर दिवाळीपूर्वी वेतन कधी होणार ही चिंता कर्मचाऱ्यांना सतावत आहे़
जिल्हा परिषद दिवाळी वेतनावर अनिश्चिततेचे सावट
By admin | Published: October 10, 2014 11:00 PM