लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या न्याय व रास्त मागण्यांसाठी येत्या १२ ते १४ जुलै दरम्यान जिल्हा परिषदेचे कर्मचारी संपावर जाणार असल्याचे पत्र महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांना शुक्रवारी (दि.७) देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषद व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या राज्य स्तरावर काही मागण्या प्रलंबित आहेत. यासंदर्भात प्रलंबित मागण्यांची यादी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बलराज मगर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्य सचिवांना यापूर्वीच दिली आहे. तसेच राज्याच्या ग्रामविकास विभागाशी निगडीत ज्या प्रलंबित मागण्या आहेत. त्या मार्च २०१७ मध्ये जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनांनी केलेल्या आंदोलनातील प्रमुख मागण्या व जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने केलेल्या वेळोवेळी मागण्यांचादेखील अंतर्भाव आहे. शासनाकडून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या सोडविण्याबाबत कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांची सोडवणूक होण्यासाठी १२ ते १४ असे तीन दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या १२ ते १४ जुलैला जिल्हा परिषद कर्मचारी संपावर जाणार असल्याचे निवेदनात म्हटले होते. यावेळी संघटनेचे विजयकुमार हळदे, प्रशांत कवडे, वसंत डोंगरे, रवि थेटे, संदीप गावंडे, विलास शिंदे, गणेश गांगुर्डे, यासिन सय्यद, राजेंद्र बैरागी, चंद्रशेखर फसाळे, श्रीपाद जोशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
जिल्हा परिषद कर्मचारी जाणार संपावर
By admin | Published: July 08, 2017 12:25 AM