नाशिक : विविध प्रलंबित मागण्यांसाठी २ सप्टेबर रोजी देशातील केंद्र सरकारी व राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली असून, संपात ११ संघटना सहभागी असल्याचा दावा सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष दिलीप थेटे व कार्याध्यक्ष महेश आव्हाड यांनी सांगितले, तर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेअंति २ सप्टेंबरला होणाऱ्या संपात जिल्हा परिषदेच्या कोणत्याही संघटना सहभागी होणार नसल्याचा दावा जि. प. कर्मचारी युनियनचे कार्याध्यक्ष विजयकुमार हळदे तसेच रवींद्र थेटे यांनी सांगितले.गुरुवारी (दि.१) मुंबईत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांच्या रॉटलस्टोन या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन प्रलंबित कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा होऊन यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्याचे आश्वासन पंकजा मुंडे यांनी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. तसेच २ सप्टेंबरच्या संपातून जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांनी सहभागी होऊ नये, असे आवाहन उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले. यावेळी बैठकीस बलराज मगर, बाबूराव पूजरवाड, विवेक लिंगराज, विजयसिंह सूर्यवंशी, दीपक जोशी, अरुण सरमाटे, अशोक जयसिंगपुरे उपस्थित होते. दरम्यान, राज्यातील विविध ११ सरकारी कर्मचारी संघटना संपावर ठाम असून, २ सप्टेंबरच्या संपात या ११ संघटना सहभागी होणार आहेत. त्यानुसार २ सप्टेंबरला नाशिक जिल्हा सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने सकाळी ११ वाजता गोल्फ क्लब मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष दिलीप थेटे, कार्याध्यक्ष महेश आव्हाड, सुनंदा जरांडे, उत्तम गांगुर्डे आदिंनी दिली. (प्रतिनिधी)
संपातून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची माघार
By admin | Published: September 02, 2016 12:16 AM