लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना उपसभापती रूपचंद भागवत यांनी दिलेल्या अचानक भेटीत शाळेतील अनेक समस्या समोर आल्या. या भेटीत शाळेतील कडधान्य निकृष्ट असणे, स्वच्छतागृहांची दुरवस्था आदी बाबी समोर आल्या. पिंपळगाव लेप येथे शिक्षकांच्या सहविचार सभेत शिक्षकांची हाणामारी झाली. ही बाब समाजाला शिक्षकांकडून अपेक्षित नाही. काही मुद्द्यांवर वादावादी होते, मात्र या वादावादीचे रूपांतर गुद्दागुद्दीत होउ नये. प्रश्न, समस्या चर्चेने सुटत असल्याचेही भागवत यांनी या भेटीत सांगितले.भागवत यांनी पिंपळखुटे बुद्रुक, तळवाडे, अंगुलगाव, गवंडगाव, सुरेगाव रस्ता आदी गावांतील प्राथमिक शाळांबरोबरच न्याहारखेडे येथील उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळेला अचानक भेट दिली. या भेटीत शालेय पोषण आहारात निकृष्ट दर्जाचे कडधान्य, शालेय परिसराची अस्वच्छता, स्वच्छतागृहांची दुरवस्था आदी बाबी प्रकर्षाने जाणवल्या, तर एका उर्दू शाळेची शिक्षिका रजेचा अर्ज न देता शिक्षक हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करून निघून गेल्याचे दिसले. त्यामुळे आपण त्या शाळेत तशी नोंद केली असल्याचे भागवत यांनी सांगितले. या सर्व घटनांची नोंद आपण घेतली असून, पंचायत समितीकडे चांगल्या शिक्षकांचे कौतुक व्हावे व कामचुकारांना समज मिळावी यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे व तालुक्यातील सर्वच प्राथमिक शाळांना अचानक भेटी देणार असल्याचे भागवत म्हणाले.सर्वत्र इंग्रजी शाळांचे फॅड वाढले असताना मराठी शाळांची लोकप्रियता कमी झाली नसल्याचे शिक्षकांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा उंचावणे तुमच्या हातात आहे. आपण जर अपेक्षेएवढे ज्ञानाचे दान या बालकांच्या पदरात टाकत असू तर आपल्या गुरूंचे अनुकरण करणारी ही बालके उद्या तुमचे गुण गातील, असे प्रतिपादन भागवत यांनी केले.मराठी वाचनात अडथळेशिक्षकांच्या परवानगीने काही वर्गातील मुलांशी संवाद साधला असता विद्यार्थी मराठी वाचताना अडखळत होते, तर इतर वर्गातील विद्यार्थ्यांची अवस्थाही यापेक्षा वेगळी नव्हती. मात्र काही प्राथमिक शाळातील विद्यार्थी हुशार दिसले. मराठी वाचनाबरोबरच इंग्रजीचे वन, टू, थ्री, फोर बरोबरच ए, बी, सी, डी तोंडीपाठ असल्याचे दिसून आल्याचे भागवत म्हणाले.
जिल्हा परिषदेच्या शाळांची झाडाझडती
By admin | Published: July 13, 2017 11:38 PM