नाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळा येत्या १७ जूनपासून सुरू होणार असल्या तरी, कोणताही मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रत्येक शाळेच्या कार्यक्षेत्रातील ६ ते १४ वयोगटांतील मुलांचा शोध घेऊन त्यांची पटनोंदणी करण्याच्या कामास मंगळवारपासून जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली आहे. येत्या ३० जूनपर्यंत ही नोंदणी सुरू राहणार आहे.राज्य सरकारने या संदर्भात सर्व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ११ ते ३० जून या कालावधीत ६ ते १४ वयोगटांतील सर्व मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी पटनोंदणी पंधरवडा राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक असून, जिल्ह्यात गुणवत्ता विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे तसेच मुलगा शाळेमध्ये येण्यासाठी १०० टक्के पटनोंदणी करून मोठ्या प्रमाणात प्रवेशोत्सव सोहळा साजरा करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये पटनोंदणी व शाळा प्रवेशोत्सव उपक्रम राबविण्यात येणार असून, तशा सूचना सर्व गटविकास अधिकारी तसेच गट शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.शाळा प्रवेशोत्सव सोहळा व पटनोंदणी पंधरवडा अंतर्गत मंगळवारी जूनला गटस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येऊन, गटशिक्षणाधिकारी अथवा प्रशासनाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांची पटनोंदणी पंधरवडा व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम आयोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे तालुकास्तरीय सर्व खातेप्रमुख व अधिकाऱ्यांना शाळा वाटप करून संपर्क अधिकाºयांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या. बुधवारी जूनला जिल्हास्तरावर संपर्क अधिकाºयांची पटनोंदणी पंधरवड्यात शाळांना भेटी देण्याचे नियोजन भेट पत्राचे वाटप करण्यासोबतच स्थानिक माध्यमातून प्रचार व प्रसार करण्यात येणारआहे. १३ जून रोजी प्रत्येक शाळास्तरावर शाळा व्यवस्थापन समितीची सभा होणार असून, १३ ते १६ जून या कालावधीत गावपातळीवर दवंडी देऊन मुलांना शाळेपर्यंत आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. १४ जूनला सायंकाळी गावस्तरावर ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, अंगणवाडी सेविका व मदतनीस, तलाठी, कोतवाल, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ, सर्व पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांनी मशाल फेरीचे आयोजन करणे याप्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत.विविध कार्यक्रमांचे आयोजन१६ जूनला शाळा प्रवेश दिंडी, शाळा व्यवस्थापन समितीची बैठक, पालक-शिक्षक समिती बैठक, नवागतांचे स्वागत, मोफत पाठ्यपुस्तके वितरित करणे, मोफत गणवेश खरेदीचा आढावा घेण्यात येणार असून, १७ ते २९ जून या कालावधीत शाळा प्रवेशासाठी पटनोंदणी पंधरवडा कार्यक्रमाचे शिबिर, २५ जूनला गावात शाळाबाह्य मुलांच्या भेटी घेणे, २५ ते ३० जून या कालावधीत प्रत्यक्ष पालकांच्या भेटी घेऊन मुलांना शाळेत प्रवेशित करून १ जुलैला पटनोंदणी पंधरवड्यात केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती जिल्हास्तरावर सादर करण्याच्या सूचना सर्व गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकाºयांना देण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटनोंदणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 1:10 AM
जिल्हा परिषदेच्या शाळा येत्या १७ जूनपासून सुरू होणार असल्या तरी, कोणताही मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रत्येक शाळेच्या कार्यक्षेत्रातील ६ ते १४ वयोगटांतील मुलांचा शोध घेऊन त्यांची पटनोंदणी करण्याच्या कामास मंगळवारपासून जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली आहे. येत्या ३० जूनपर्यंत ही नोंदणी सुरू राहणार आहे.
ठळक मुद्देशाळाबाह्य मुलांचा शोध : गावागावात पिटणार दवंडी