वणी : दिंडोरी-पेठ विधानसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांनी मताधिक्याने विजय मिळाल्याचे वृत्त वणीत पोहोचताच कार्यकर्ते व समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत पेढे वाटून विजयोत्सव साजरा केला. मतमोजणीच्या प्रारंभापासूनच झिरवाळ आघाडीवर राहिले. २७ फेऱ्यांमध्ये ६० हजारांपेक्षा जास्त मतांनी नरहरी झिरवाळ यांनी बाजी मारली. झिरवाळ यांचे वणीत आगमन झाल्यानंतर घोषणाबाजीने परिसर दुमदुमला. यावेळी गुलालाची उधळण करण्यात आली.दरम्यान, निफाड येथे राष्ट्रवादीचे दिलीप बनकर यांनी अनिल कदम यांचा पराभव करून विजय मिळविल्यानंतर बनकर सप्तशृंग गडावर दर्शनासाठी गेले होते. तेथून ते परतल्यानंतर दिलीप बनकर व नरहरी झिरवाळ यांची भेट झाली. एकमेकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. माजी सरपंच मधुकर भरसट, वणी मर्चंट बँकेचे अध्यक्ष विलास कड, उपसरपंच मनोज शर्मा, देवेंद्र गांगुर्डे, दगू भरसट, शकुंतला कोकाटे, सरपंच सुनीता भरसट, बब्बू शेख, जमीर शेख, हसमुख बोथरा, कारभारी कड, विजय बर्डे, रवि सोनवणे, महेंद्र बोरा, किशोर बोरा, शरद महाले, केदू पाटील, सतीश जाधव आदींनी जल्लोष केला. वणी मर्चंट बँकेचे संस्थापक किसनलाल बोरा यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठानात जाऊन आमदार झिरवाळ यांनी त्यांची भेट घेतली. हा माझा विजय नसून, कार्यकर्ते, हितचिंतक, समर्थक, मार्गदर्शक यांचा विजय असून, धनशक्ती विरु द्ध जनशक्ती अशा लढाईत जनतेचा विजय झाला आहे.मतदारांची परतफेड विकासकामे व समस्यांचे निराकारण करून करेल, अशी ग्वाही झिरवाळ यांनीदिली. दत्तात्रय शेटे, गणपत पाटील, भास्कर भगरे, योगेश गोसावी, अनिल देशमुख आदी याप्रसंगी उपस्थित होते.
झिरवाळ यांच्या विजयाने वणीत जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 11:36 PM