नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील आठशेपैकी साडेसहाशे कर्मचारी निवडणुकीच्या कामाला नियुक्त केले गेल्याने काल मंगळवारी (दि. १४) जिल्हा परिषद सुनी-सुनी झाल्याचे चित्र होते. प्रत्येक विभागात दोन-तीन कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त कर्मचारी नसल्याने जिल्हा परिषद अशरक्ष: ओस पडल्याचे चित्र होते. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात सुमारे आठशेहून अधिक कर्मचारी नियुक्त आहेत. बुधवारी (दि.१५) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असल्याने त्यापैकी ६४० कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केले गेले असल्याने मंगळवारी (दि.१४) सकाळपासूनच त्यांना मतदान यंत्रे (ईव्हीएम) घेऊन मतदान केंद्राकडे पाठविण्यात आले. इतक्या मोठ्या संख्येने कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केले गेल्याने जिल्हा परिषद मुख्यालयात प्रत्येक विभागात अवघे दोन-तीन कर्मचारीच विभागात हजर असल्याचे चित्र होते. पदाधिकारीही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अडकल्याने त्यांनी जिल्हा परिषदेकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. त्यामुळे पदाधिकारी आणि मुख्यालयातील सर्वच विभागांत सुने-सुने वातावरण होते. आता ही जिल्हा परिषद गुरुवार (दि.१६) पासून पुन्हा गजबण्याची चिन्हे असून, त्यानंतर दिवाळीच्या सुट्टीत पुन्हा ओस पडण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)
‘झेडपी’ झाली सुनी-सुनी
By admin | Published: October 15, 2014 12:50 AM