नवी दिल्ली - भ्रष्टाचाराविरोधातील लढाईतून जन्म झालेल्या आम आदमी पक्षाला आता भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करावा लागत आहे. आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे १५६ दिवस जेलमध्ये होते. जामीनावर बाहेर आलेले केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा कली आता जोवर जनता मला खुर्चीवर बसवणार नाही तोवर मी मुख्यमंत्री होणार नाही असंही त्यांनी सांगितले.
आजपासून १२ वर्षापूर्वी अरविंद केजरीवाल त्या हजारोंच्या गर्दीतील एक घटक होते, जी दिल्लीच्या जंतर मंतरवर अण्णा हजारेंच्या आंदोलनात सहभागी होते. परंतु आज अरविंद केजरीवाल राष्ट्रीय राजकारणात एक महत्त्वाचा चेहरा बनले आहेत. भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारेंचं आंदोलन झालं होते. त्यावेळी अरविंद केजरीवाल सक्रीयपणे या लढ्यात उतरले होते. अण्णा हजारेंचं आंदोलन दिर्घकाळ चालले.
२ ऑक्टोबर २०१२...
ही तीच तारीख आहे ज्यादिवशी अरविंद केजरीवाल यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. केजरीवाल यांनी अण्णांच्या आंदोलनाचा वापर राजकीय फायद्यासाठी केला असा आरोपही त्यांच्यावर झाला. मात्र देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी राजकारणात आलोय, सिस्टममध्ये घुसून आतील साफसफाई करू असं केजरीवाल आणि त्यांचे समर्थक बोलत होते. अखेर २६ नोव्हेंबर २०१२ रोजी अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी नावाच्या राजकीय पक्ष स्थापन केली. सर्व पक्षांनी विश्वासघात केला, सर्व पक्ष एकमेकांना मदत करतात. जोपर्यंत राजकारण बदलणार नाही तोपर्यंत भ्रष्टाचारमुक्त होणार नाही. त्यासाठी आम्ही आम आदमी पार्टीची स्थापन केली असं केजरीवालांनी म्हटलं.
२०१३ साली दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपने सर्व जागा लढण्याचं ठरवलं. त्यानंतर पहिल्याच निवडणुकीत दिल्लीत आपनं ७० पैकी २८ जागा विजयी होत सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांना धक्का दिला. अरविंद केजरीवालांनी तीन वेळा दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दिक्षित यांचा पराभव केला. त्यानंतर बहुमत न मिळाल्याने काँग्रेससोबत मिळून केजरीवाल सत्तेत आले. मात्र या आघाडीवर आरोप होऊ लागले तेव्हा अवघ्या ४९ दिवसांत केजरीवालांनी राजीनामा दिला.
वर्षभर राष्ट्रपती राजवटीनंतर दिल्लीत निवडणुका झाल्या. त्यात अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकून बहुमत मिळवलं आणि स्वबळावर दिल्लीत सरकार स्थापन केले. फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. यावेळी ७० पैकी ६२ जागा आपने जिंकल्या. २०१५ च्या तुलनेत आमदारांची संख्या घटली परंतु पुन्हा बहुमत मिळवणं हे चमत्कारापेक्षा कमी नव्हतं.
१० वर्षात राष्ट्रीय पक्षाचा दर्जा
२ वर्षापूर्वी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात १३ टक्के मते आपला मिळाली. त्याठिकाणी ५ जागा केजरीवालांच्या पक्षाने जिंकल्या त्यामुळे आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. सध्या दिल्ली आणि पंजाब याठिकाणी आम आदमी पक्षाचं सरकार आहे. दिल्लीत ६२, पंजाबमध्ये ९२, गुजरातमध्ये ५, गोवा असे एकूण १६१ आमदार आहेत. त्याशिवाय दिल्ली महापालिकेत आपची सत्ता आहे. संसदेत आपचे १३ खासदार आहेत त्यात लोकसभेत ३ आणि राज्यसभेत १० खासदार आहेत.