नवी दिल्ली : समाजाचे आपण काही देणे लागतो, या उदात्त भावनेतून भारतीय वायू दलातील एका माजी कर्मचाऱ्याने निवृत्तीनंतर संरक्षण मंत्रालयाला १.०८ कोटी रुपयांची देणगी दिली. माजी एअरमन सीबीआर प्रसाद (७४) यांनी दिल्लीत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन उपरोक्त रकमेचा धनादेश सुपूर्द केला. आजवरच्या आयुष्यात सर्व पै-पै जमवून केलेली संपूर्ण बचत त्यांनी दान केली, त्यांचे हे औदार्य पाहून मीही भारावून गेलो, असे राजनाथसिंह म्हणाले.वायू दलाच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर प्रसाद यांनी उदरनिर्वाह चालविण्यासाठी कुक्कुटपालन सुरू केले. त्यातून मिळणाºया कमाईतून कौटुंबिक जबाबदाºया समर्थपणे पार पाडल्या. भारतीय रेल्वेत नोकरी करण्यासाठी त्यांनी नऊ वर्षांच्या सेवेनंतर वायू दल सोडले. दुर्दैवाने रेल्वेत नोकरी मिळाली नाही. तेव्हा उदरनिर्वाहासाठी कुक्कुटपालन सुरू केले. सुदैवाने संसाराचा गाडा व्यवस्थित चालला. सर्व कौटुंबिक जबाबदाºया पार पाडता आल्या. दोन टक्के संपत्ती मुलीला आणि एक टक्के संपत्ती पत्नीला दिली.बाकी ९७ टक्के संपत्ती समाजाला दान देत आहे. माझ्या या निर्णयाला कुटुंबियांकडून कसलीही आडकाठी झाली नाही, असे प्रसाद यांनी सांगितले.आयुष्यात वाटचालीत कराव्या लागलेल्या संघर्षमय दिवसांची आठवण सांगत ते म्हणाले, ‘मी घर सोडले तेव्हा खिशात फक्त पाच रुपये होते. मेहनत करून पाचशे एकर जमीन घेतली. माझे बालपणी आॅलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्याचे स्वप्न होते; परंतु मला ते साकार करता आले नाही. भारतीय मुलांनी आॅलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकावे म्हणून मी पाचशे एकर जमिनीत विद्यापीठासारखे क्रीडा संकुल उभारले. गेल्या वीस वर्षांपासून मी मुलांना प्रशिक्षण देत आहे.’
संरक्षण मंत्रालयाला १ कोटीचे दान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 4:47 AM