भोपाळ - देशात कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनली असून गेल्या कित्येक दिवसांपासून अनेक राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. एकीकडे लॉकडाऊनमुळे नागरिक त्रस्त असताना दुसरीकडे रुग्णालयातील धावपळ आणि नातेवाईकांना रुग्णावरील उपचारासाठी करावा लागणारा मनस्ताप हाही चर्चेचा विषय बनला आहे. रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा बिलांची आकारणी होत आहे. तरीही अनेक रुग्ण दगावत आहेत. आता, मध्य प्रदेश सरकारने पीडित कुटुंबाला मदत देण्याचं जाहीर केलं आहे.
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना थोडाशा आर्थिक मदतीने धीर देण्याचं काम मध्य प्रदेश सरकारने केलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना मध्य प्रदेश सरकारकडून 1 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.
मध्य प्रदेशात दरमहा 5 हजार पेन्शन
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले की, कोरोनाच्या साथीमुळे आई-वडीलांचे छत्र हरवलेल्या मुलांना दरमहा 5000 रुपये पेन्शन देण्यात येईल. या मुलांना मोफत शिक्षण आणि त्यांच्या कुटूंबियांना मोफत रेशनचीही व्यवस्था केली जाणार आहे. कोरोनामुळे अनेक कुटूंबे मोडली आहेत, तर काहीनी आपल्या म्हातारपणाची काठी गमावली आहे. म्हणूनच अशा प्रकारच्या कुटुंबांना सरकारकडून दरमहा 5,000 रुपये पेन्शन देण्यात येणार आहे.