लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: सुट्टीवर असताना तातडीचा किंवा महत्त्वाचा फोन, ईमेल किंवा मिटिंगमध्ये उपस्थित राहावे लागणे, म्हणजे कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी सर्वात त्रासदायक गोष्ट असते. अशा गोष्टींमुळे सुट्टीची मजा कमी होते. पण, आता एका भारतीय कंपनीने या समस्येचे निराकरण करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.
स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी स्टार्टअप ‘ड्रीम ११’ ने आपल्या कर्मचाऱ्यांना व्यत्ययमुक्त सुट्ट्यांचा आनंद घेता यावा, याासाठी “ड्रीम ११ अनप्लग” हे नवीन धोरण स्वीकारले आहे. या धोरणांतर्गत, कंपनीचे कर्मचारी संपूर्ण आठवडाभर सर्व कार्यालयीन कामकाज, संबंधित संभाषणे (ईमेल, व्हॉट्सॲप ग्रुप किंवा फोन कॉल) आणि सहकारी कर्मचाऱ्यांपासून स्वतःला पूर्णपणे ‘अनप्लग’ करू शकतात. म्हणजेच या कालावधीत त्यांना कोणत्याही प्रकारे डिस्टर्ब केले जाणार नाही.
कर्मचाऱ्याशी संपर्क केल्यास दंड
“अनप्लग” वेळेत कर्मचाऱ्यांशी संपर्क साधल्यास संबंधित सहकाऱ्याला १२०० डॉलर (सुमारे १ लाख रुपये) दंड भरावा लागेल, असा इशाराही ड्रीम ११ चे सह-संस्थापक हर्ष जैन आणि भावित सेठ यांनी कर्मचाऱ्यांना दिला असून हे आतापर्यंत प्रभावी ठरल्याचेही त्यांनी सांगितले.
सर्वांना मुभा...
वरच्या बॉसपासून नवीन कर्माचाऱ्यांपर्यंत प्रत्येक जण दरवर्षी एका आठवड्यासाठी कंपनीच्या सिस्टिममधून ‘साइन आउट’ करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाला त्याचा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे कर्मचारी खुश आहेत.
म्हणून सुरू केले अनप्लग धोरण
- फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म ड्रीम ११ ने लिंक्डइन पोस्टद्वारे प्रसिद्ध केलेल्या निवेदनात अनप्लग धोरणाबद्दल सांगितले. ड्रीम ११ मध्ये, प्रत्यक्षात ‘ड्रीमस्टर’ ला लॉग ऑफ करतो.
- कंपनीतील कोणीही मेहनतीने कमावलेल्या सुट्टीचा आनंद घेत असताना त्यांच्या संपर्कात राहू नये, यासाठी आम्ही हे करतो.
- कारण, प्रियजनांसोबत दर्जेदार वेळ घालवणे किंवा सुट्टीवर पूर्णपणे आराम करणे यामुळे एकूण मूड, जीवनाची गुणवत्ता, सर्वसाधारणपणे उत्पादकता आणि बरेच काही वाढू शकते, असा आमचा विश्वास आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"