प्रत्येक निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिला वर्गाला पुन्हा एकदा काँग्रेसकडे वळवण्यासाठी पक्षाने ‘नारी न्याय गॅरंटी’च्या माध्यमातून पाच मोठ्या घोषणा केल्या आहेत. गरीब कुटुंबातील एका महिलेला दरवर्षी एक लाख रुपये देण्याची घोषणा ही या पाच गॅरंटीमधील प्रमुख घोषणा आहे. या पाच गॅरंटीमुळे देशातील महिलांचं जीवन कायमस्वरूपी बदलणार असल्याचा, दावा ही घोषणा करताना काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
सध्या भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधत असलेले काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज सोशल मीडियावर ट्विट करत काँग्रेसने महिलांसाठी देऊ केलेल्या ‘नारी न्याय गॅरंटी’ची घोषणा केली आहे. काँग्रेसने नारी न्याय गॅरंटीच्या माध्यमातून केलेल्या ५ प्रमुख घोषणा पुढील प्रमाणे आहेत.१) महालक्ष्मी: सर्वात गरीब कुटुंबातील एका महिलेला दरवर्षी एक लाख रुपयांची गॅरंटी२) अर्धी लोकसंख्या, पूर्ण हक्क : केंद्र सरकारमध्ये सर्व नव्या भरती प्रक्रियांचा अर्धा हिस्सा हा महिलांसाठी आरक्षित करण्याची गॅरंटी.३) शक्तीचा सन्मान : आशा, अंगणवाडी आणि मध्यान्ह भोजन तयार करणाऱ्या महिलांच्या वेतनामध्ये केंद्र सरकारचं योगदान दुप्पट करण्याची गॅरंटी ४) अधिकार मैत्री: सर्व पंचायतीमध्ये एका अधिकार मैत्रीच्या नियुक्तीची गॅरंटी, जे महिलांना जागरूक करून त्यांना त्यांचे कायदेशीर अधिकार देण्यासाठी मदत करतील ५) सावित्रीबाई फुले वसतीगृह : देशात नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृहांची संख्या दुप्पट करणे, प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वसतीगृत बांधण्याची गॅरंटी. काँग्रेसचं लक्ष्य देशातील निम्म्या लोकसंख्येला आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवणं आणि बरोबरीचं प्रतिनिधित्व देणे हे आहे. या पाच ऐतिहासिक पावलांच्या माध्यमातून काँग्रेस महिलांसाठी समृद्धीचं द्वार उघडणार आहे, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.