ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि, ५ - जम्मू-काश्मीरमधील कूपवाडा परिसरात दहशतवादी व लष्कराच्या जवानांदरम्यान झालेल्या चकमकीत १ दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश मिळाले असले तरी या चकमकीत ४ जवान शहीद झाले आहेत. कूपवाडा येथील लोलबाच्या घनदाट जंगलात काल रात्रीपासून ही धुमश्चक्री सुरू आहे.
उत्तर काश्मीरच्या लोलबाच्या जंगलात काही दहशतवादी लपले असून त्यांच्याकडे मोठा शस्त्रसाठा असल्याची खबर लष्कराला रविवारी संध्याकाळी मिळाली असता त्यांनी लगेच शोधमोहिम सुरू केली. दहशतवाद्यांना त्यांची चाहूल लागल्यावर त्यांनी लष्कराच्या जवानांवर जोरदार गोळीबार केला. त्या गोळीबारास जवानांनी प्रत्युत्तर देत एक दहशतवाद्याला कंठस्नान घातले. मात्र या चकमकीत चार जवान शहीद झाले. ही चकमक अद्याप सुरूच आहे.
दरम्यान रविवारी सुरक्षा दलाच्या जवानांनी त्राल येथील एन्काऊंटरदरम्यान जैश- ए-मोहम्मद संघटनेच्या दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते. दोन्ही दहशतवादी पुलवामा जिल्ह्यातील हारी गावात लपले होते. अनके तास चाललेल्या या धमश्चक्रीत अखेर दोन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश मिळाले.