अहमदाबाद : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आता तर गुजरात देशातील कोरोनाचा नवा हॉटस्पॉट होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. येथे गुरुवारी 163 नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. या बरोबरच येथील कोरोना रुग्णांची संख्याही आता 929वर पोहोचली आहे. एवढेच नाही, तर एकट्या अहमदाबादमध्ये 95 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
गुजरातमधील अहमदाबादमध्ये कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. येथील एकूण रुग्णांपैकी 59 टक्के रुग्ण अहमदाबादमधील आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, रेड हॉटस्पॉट झोनमध्ये सामील असलेल्या अहमदाबादमध्ये गेल्या 5 दिवसांत दर 24 मिनिटाला एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे.
आरोग्य मंत्रालयाने गुरुवारचे जे आकडे पाठवले आहेत. ते अत्यंत बोलके आहेत. गुजरातमध्ये गुरुवारी सायंकाळपर्यंत 929 कोरोनाबाधित आढळून आले. यांपैकी 36 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या मुख्य आरोग्य सचिव जयंती रवी यांनी सांगितल्यानुसार, डॉक्टर्ससह एकूण 26 सरकारी कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. एलजी हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि जीएमईआरएसमधील सिव्हिल हॉस्पिटलच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे बोलले जात आहे.
गेल्या पाच दिवसांत अहमदाबादमध्ये तब्बल 302 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. येथे पूर्वी 243 रुग्ण होते. मात्र आकडेवारीचा विचार केल्यास येथील कोरोनाबाधितांचा आकडा फार वेगाने वाढत आहे. येथे दर 24 मिनिटाला एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे.
929पौकी 545 रुग्ण एकट्या अहमदाबादमधील -गुजरातमधील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 929 आहे. यात 545 रुग्ण एकट्या अहमदाबादमधील आहेत. अहमदाबादमधील जास्तीत जास्त रुग्ण हे जुहापुरा, कालूपूर, जमालपूर, बेहरामपुरा, दानलिमडा, बोडकदेव, गोमतीपूर आणि मेघनीनगर येथील आहेत.