नवी दिल्ली - कोरोना विषाणूला (कोविड-१९) रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकदा माणूसकीचे दर्शन होत आहे, तर अनेकदा देशातील गरिबीचे भीषण वास्तव पुढे येत आहे. लॉकडाऊन असल्याने आपल्या गावी, घराकडे जाण्यापासून वंचित राहिलेले मजूर शहरात अडकले आहेत. या शहरांमध्ये सरकारकडून मजुरांची राहण्याची व जेवणाची सोय केली जात आहे. मात्र, आजारी असलेल्या मजुरांना रुग्णालयात जाणे शक्य होत नाही. दिल्लीत अशाच एका आजारी असलेल्या स्थलांतरी मजुराने अखेर जीव सोडला. गोरखपूर येथील मजदूर सुनिल (३७) यांचे दिल्ली येथे निधन झाले. मात्र, पतीचा मृतदेह गावाकडे नेण्यासही महिलेकडे पैसे नव्हते.
दिल्ली पोलिसांनी सुनिल यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या गोरखपूर येथील कुटुंबीयांना दिली. मात्र, गरिबीने पछाडलेल्या या कुटुंबाकडे सुनिल यांचा मृतदेह गावाकडे आणण्यासही पैसै नव्हते,आणि लॉकडाऊनही. त्यामुळे पीडित पत्नीने ग्रामपंयातीकडे याबाबत विनंती केली. पण, तेथूनही निराशाच पदरी आली. त्यामुळे पीडिताने चक्क नवऱ्याच्या पुतळ्यावर अंत्यसंस्कार केले. तसेच, मी पतीचा मृतदेह नेऊ शकत नाही, असे म्हणत पोलिसांना शक्क झाले तर त्यांच्या अस्ती पाठविण्याची विनंती केली. सध्या देशात लॉकडाऊन असल्याने गोरखपूरमधील संबंधित तहसिलदारांनी दिल्ली पोलिसांनाच सुनिल यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्याचे सूचवले आणि शक्य असेल तर पीडित कुटुंबीयांना अस्ती पाठविण्यात याव्यात, अशी विनंतीही त्यांनी केली. मात्र, तहसिलदारांच्या या निरोपामुळे दिल्ली पोलीसही पेचात पडले आहेत. त्यामुळे अद्यापही सुनिल यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत.
मूळ डुमरी-खुर्द, चौरी-चौरा येथील सुनिल हे दिल्लीच्या प्रताप नगर भागात एका भाड्याचा खोलीत राहात होते. याच परिसरात ते मोलमजुरीचे काम करत. गावाकडे पत्नी पूनम यांच्यासह ४ मुली आणि १ मुलगा आहे. लॉकडाऊनमुळे सुनिल सध्या दिल्लीतच अडकून पडले होते. त्यातच ते आजारी पडले, पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले, पण उपचारादरम्यान सफदरगंज रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. एकीकडे कुटुंबीया त्यांना फोन करत होते, पण मोबाईल रुमवर असल्याने त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. अखेर, पोलिसांनी सुनिल यांच्या मोबाईलवरुन कुटुंबीयांशी संपर्क साधून मृत्युची बातमी दिली. मात्र, पैसे नसल्याने व लॉकडाऊनमुळे सुनिल यांचे पार्थीव गावाकडे नेऊ शकत नसल्याचे पत्नीने सांगितले. अखेर, आपल्या १ वर्षाच्या मुलाकडून पत्नी पूनम यांनी सुनिल यांचा पुतळा बनवून त्यावर अंत्यसंस्कार केले. या घटनेन गरिब कुटुंबीयांची होणारी हेळसांड पाहून अनेकांच्या ह्दयाचं पाणी-पाणी होत आहे.