नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यातील शहिदांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झालं असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर गेल्या वर्षी 14 फेब्रुवारी रोजी भ्याड हल्ला झाला. या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. सीआरपीएफनेही आपल्या शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. काश्मिरच्या लेथपोरा सेक्टरमधील सीआरपीएफ कॅम्पसमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे उमेश गोपीनाथ जाधव यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
उमेश गोपीनाथ जाधव यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी भारतभर तब्बल 61 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. उमेश यांनी शहिदांच्या मूळ गावी जाऊन तेथील माती जमा केली आहे. प्रत्येक जवानाच्या गावी जाऊन तेथील माती एका कलशामध्ये जमा करुन सर्व कलश एकत्र करुन त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. हे सर्व कलश सीआरपीएफ तळावर शहीद जवानांची आठवण म्हणून ठेवण्यात येणार आहेत. भारतभर केलेल्या प्रवासादरम्यान उमेश यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
उमेश जाधव यांच्या या अनोख्या कार्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांनाही गर्व आहे. 'माझी पत्नी आणि मुलांना माझा अभिमान वाटतो यातच सर्व आलं. भविष्यात माझीही मुलं सैन्यात भरती होतील आणि इतरही मुलांना प्रेरणा मिळेल अशी आशा आहे' असं उमेश यांनी सांगितलं. तसेच शहीद जवानांच्या कुटुंबियांचं राहतं घर शोधणं सोपं नव्हतं. काही जण अत्यंत दुर्गम भागात राहतात. तसेच अनेक अडचणींचा सामना करावा लागला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
उमेश जाधव हे फार्माकॉलजिस्ट आणि उत्तम संगीतकार आहेत. उमेश यांनी हा संपूर्ण प्रवास त्यांच्या एका खासगी कारमधून केला आहे. त्यांच्या कारवरही देशभक्तीवर घोषवाक्य लिहीली आहेत. ते रोज याच गाडीत झोपायचे. उमेश यांनी शहिदांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी भारतभर 61 हजार किमीचा प्रवास केला. त्यांचा हा प्रवास गेल्या आठवड्यात संपला, ज्याला ते 'तीर्थयात्रा' मानतात. सीआरपीएफनेही आपल्या शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. गर्व इतना था कि हम देर तक रोये नही... असं म्हणत CRPF ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली. त्यांनी आपले जीवन आपल्या देशाच्या सेवेसाठी आणि संरक्षणासाठी वाहिले. पुलवामा हल्ल्यातील जवानांचे बलिदान देश कधीच विसरणारही नाही' असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. गृह मंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी ट्विट केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Raj Thackeray: 'हिंदूजननायक' उपाधीवर राज ठाकरेंनी हातच जोडले, जरा चिडूनच म्हणाले...
पुलवामा हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला?; राहुल गांधींचा सवाल
Pulwama Attack : पुलवामा हल्ल्यातील शहिदांना पंतप्रधानांसह दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली
आघाडीत बिघाडी? शरद पवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांच्या 'तो' निर्णय अतिशय अयोग्य