काँग्रेसचे १० ते १२ आमदार राजीनामा देणार?; भाजपाच्या खेळीने राजकारण तापणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 08:40 AM2020-03-16T08:40:06+5:302020-03-16T08:43:32+5:30
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजीनामा दिलेल्या ५ काँग्रेस आमदारांमध्ये जेवी काकडिया आणि सोमाभाई पटेल हे दोन आमदार असू शकतात.
अहमदाबाद - मध्यप्रदेश पाठोपाठ काँग्रेसलागुजरातमध्येही झटका बसला आहे. गुजरातकाँग्रेसच्या चार आमदारांच्या राजीनाम्यानंतर आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे. आतापर्यंत गुजरातमध्ये काँग्रेसच्या ५ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिला आहे.
विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा देणाऱ्यांच्या नावाचा खुलासा अद्याप झाला नाही. गुजरात विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी काँग्रेसच्या ४ आमदारांचा राजीनामा स्वीकारला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजीनामा दिलेल्या ५ काँग्रेस आमदारांमध्ये जेवी काकडिया आणि सोमाभाई पटेल हे दोन आमदार असू शकतात. निवडणुकीपूर्वी हे दोन्ही आमदार गायब झाले असून काँग्रेसच्या संपर्कातही नाही. त्याचसोबत मंगल गावित आणि प्रद्युमन सिंह जाडेजा यांनी राजीनामा दिला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.
तर काँग्रेस आमदार प्रविण मारु यांनी राजीनामा दिल्याचं स्पष्ट झालं आहे. राजीनामा दिलेले ते पहिले आमदार आहेत. दोन दिवसांपूर्वीच मी राजीनामा दिला होता असा दावा प्रविण मारु यांनी केला आहे. मध्य प्रदेशातील राजकीय उलथापालथीनंतर राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने गुजरातमध्ये योग्य खबरदारी घेतली आहे. शनिवारी काँग्रेसने १४ आमदारांना जयपूरला हलवलं आहे. गुजरातचे आमदार जयपूरमधील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत.
५ आमदारांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने सर्व आमदारांना जयपूरला नेण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार ५ आमदारांसह अन्य १० ते १२ आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे. यापूर्वी मध्य प्रदेशातील २२ आमदारांनी राजीनामा दिला आहे.
संख्याबळ पाहता सत्ताधारी भाजपा राज्यसभेच्या चारपैकी दोना जागा स्वबळावर सहज जिंकू शकते. त्याहून जास्त जागांसाठी त्यांना इतरांची मदत लागेल किंवा विरोधकांची मते कमी व्हावी लागतील. हे राजीनामे त्याच रणनीताचा भाग असावा, असे राजकीय निरीक्षकांना वाटते. यामुळे १८२ सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसची संख्या ६९वर आली. हे राजीनामे मी मंजूर केले आहेत. त्यांची नावे मी आज विधानसभेत जाहीर करीन, असे विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी सांगितले आहे. विधानसभेत राज्यसभेसाठी मतदान २६ मार्च रोजी होणार आहे.