नवी दिल्ली : आफ्रिकी देशांना पुढील पाच वर्षांत १० अब्ज डॉलर्सचे सुलभ कर्ज, ६० कोटी डॉलर्सचे अनुदान साहाय्य व ५० हजार नव्या शिष्यवृत्त्या देण्यात येतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. भारत आणि आफ्रिकी देशांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याची एकमुखी मागणी करायला पाहिजे, असे मोदी म्हणाले. त्याचबरोबर दहशतवादाचा विरोध, हवामान बदल आणि संयुक्त राष्ट्र सुधार यांसारख्या मुद्यांवर परस्पर सहकार्य बळकट करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.नवी दिल्ली येथे गुरुवारी तिसऱ्या भारत-आफ्रिका मंच शिखर संमेलनाच्या उद्घाटन सत्रात मोदी बोलत होते. हे संमेलन म्हणजे ‘एका छताखाली एक तृतीयांश मानवतेच्या स्वप्नांची बैठक’ असल्याचे स्पष्ट करून मोदी म्हणाले, १.२५ अब्ज भारतीय आणि १.२५ अब्ज आफ्रिकींच्या हृदयांची स्पंदने एक झाली आहेत. ही भागीदारी सामरिक चिंता आणि आर्थिक लाभाच्या पलीकडची आहे. जगातील एक मोठा भागीदार एकीकृत आणि वैभवशाली आफ्रिकेचे स्वप्न साकार करण्यासाठी भारत आपल्या समर्थनाचा स्तर वाढवेल, असेही मोदी म्हणाले.मुगाबे यांची खंतझिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याची गरज असल्याचे सांगत या संदर्भातील भारताच्या मागणीला पाठिंबा दिला. या वैश्विक संस्थेच्या शक्तिशाली सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य आफ्रिकी देशांना तुच्छ समजतात, असा आरोप मुगाबे यांनी यावेळी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)‘आम्ही ६० कोटी डॉलर्सच्या अनुदान साहाय्याचा प्रस्ताव देत आहोत. त्यात १० कोटी डॉलर्स भारत-आफ्रिका विकास निधी आणि एक कोटी डॉलर भारत-आफ्रिका आरोग्य निधीचा समावेश आहे. यामध्ये पुढील पाच वर्षांत भारतात आफ्रिकन देशांच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीचाही समावेश आहे. भारत संपूर्ण आफ्रिकेत १०० क्षमता निर्माण संस्था स्थापन करणार आणि पायाभूत सुविधांचा विकास, सार्वजनिक परिवहन, स्वच्छ ऊर्जा, सिंचन, कृषी आणि उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी सहकार्य करेल, असे मोदी यांनी जाहीर केले. या संमेलनाला ४१ आफ्रिकी देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि ५४ आफ्रिकी देशांचे शेकडो वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.बदलत्या काळानुसार बदलले पाहिजेसंयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणेवर भर देताना मोदी म्हणाले, सुरक्षा परिषदेने बदलत्या जगानुरूप स्वत:ला बदलले नाही तर परिषद अप्रासंगिक ठरेल. या संस्थांनी आमची चांगली सेवा केली आहे; परंतु बदलत्या काळानुसार जे बदलत नाही ते अप्रासंगिक होण्याचा धोका असतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.भारत आणि आफ्रिका शांतता, प्रगती आणि समृद्धीच्या आपल्या एकसमान ध्येयाच्या माध्यमातून एकामेकांशी जुळलेले आहेत. ‘सबका साथ, सबका विकास’ या भावनेच्या आधारावर उभय देशांमध्ये सहकार्य व भागीदारी असली पाहिजे, असे आवाहन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या संमेलनात केले.आफ्रिकी देशांना आवाहनपंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात आफ्रिकी देशांना सौर ऊर्जा संपन्न देशांच्या आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव दिला. मोदी ३० नोव्हेंबरला पॅरिसमध्ये आयोजित हवामान बदल शिखर परिषदेत याबाबत घोषणा करतील.
आफ्रिकी देशांना दहा अब्ज डॉलर्सचे सुलभ कर्ज
By admin | Published: October 29, 2015 10:19 PM