लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : दररोज उपलब्ध होणाऱ्या कोरोना लसीच्या डोसपैकी १० टक्के डोस वाया जाण्याची शक्यता असते. ते लक्षात घेऊनच लसीकरणाचा कार्यक्रम राबवावा. त्यात कोणतीही घाईगर्दी करू नये, अशी सूचना केंद्रीय आरोग्य खात्याने राज्य सरकारांना दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्णन केल्यानुसार जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरण मोहिमेला भारतात येत्या शनिवारपासून प्रारंभ होत आहे.
त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटले आहे की, देशात प्रत्येक लसीकरण केंद्रावर दिवसभरात जास्तीत जास्त १०० लोकांना लस देण्यात यावी, असे ठरविण्यात आले आहे. त्यापेक्षा जास्त संख्येने लोकांना लस देण्याची घाईगर्दी राज्य सरकारांनी सध्या करू नये. ही संख्या नजीकच्या काळात वाढविता येईल. डॉक्टर, आरोग्यसेवकांना देण्याकरिता कोरोना लसीचा पुरेसा पुरवठा करण्यात आलेला नाही अशी तक्रार काही राज्यांनी केली आहे.
१.६५ कोटी लसीचे डोस केंद्राकडे केंद्र सरकारकडे सध्या कोरोना लसींचे १.६५ कोटी डोस असून, त्यात कोविशिल्डचे १.१ कोटी, तर कोव्हॅक्सिनचे ५५ लाख डोस आहेत. ते राज्यांना वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.