नवी दिल्ली/गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीशी संबंधित असलेल्या मीडिया आणि एंटरटेन्मेंट कंपनीला विशेष केंद्रीय योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया मंत्रालयाकडून कर्ज-संबंधित सबसिडी म्हणून १० कोटी रुपये मिळाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मात्र हे आरोप सिद्ध झाल्यास मी राजकीय संन्यास घेईन, असे म्हणत सरमा यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.
अनुदान मिळाल्याची कागदपत्रे दाखवत काँग्रेसने दावा केला की, शर्मा २०२१ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची पत्नी रिंकी भुईंया शर्मा यांच्या कंपनीने ५० बिघा शेतजमीन खरेदी केली आणि या खरेदीनंतर काही दिवसांतच हा भूखंड औद्योगिक वापरासाठी तयार करण्यात आला.
काय आहेत आरोप?-आसामचे खासदार गौरव गोगोई यांनी आरोप केला की, “शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी किसान संपदा योजना सुरू केली. परंतु सरमा यांनी आपल्या प्रभावाचा वापर करून आपल्या पत्नीच्या कंपनीला १० कोटी रुपये मिळवून दिले. -केंद्र सरकारच्या योजना भाजपला समृद्ध करण्यासाठी आहेत का, असा सवाल त्यांनी केला. - पक्षाचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी दावा केला की, कंपनीच्या संकेतस्थळानुसार, ती कंपनी मीडिया क्षेत्रात काम करते, परंतु किसान संपदा योजनेंतर्गत अन्न प्रक्रिया मंत्रालयाने अनुदान दिले आहे.