लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे/दिल्ली/मुंबई : ‘अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरातील चक्रावाताच्या स्थितीमुळे मान्सूनची प्रगती खुंटलेलीच आहे. त्याच्या केरळातील आगमनाची स्थिती अद्याप स्पष्ट नसल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले. मात्र विस्तारित अंदाजानुसार या आठवड्याच्या अखेरीस केरळमध्ये, तर महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी केरळमध्ये ४ जूनदरम्यान मान्सून येण्याची शक्यता होती. मात्र, चक्रावातामुळे आगमन लांबले. हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी यांच्या माहितीनुसार, ‘दक्षिण पूर्व अरबी समुद्रातील चक्रावाताची स्थिती मंगळवारी अधिक तीव्र होऊन कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होईल. नंतर दोन दिवसांत कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडून सरकून दक्षिणपूर्व व लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात तीव्र बनेल. पुढील दोन दिवसांत हे दोन्ही पट्टे उत्तरेकडे सरकू शकतात. त्यानंतरच चांगली स्थिती तयार होईल.’
चौदापैकी एकाच केंद्रावर पाऊस
मान्सूनचे केरळातील आगमन हे तेथील १४ केंद्रांवर झालेल्या पावसावर आधारित असते. चौदाही केंद्रांवर पावसासाठी अनुकूल स्थिती असली तरी एका केंद्रावरच सध्या पाऊस सुरू आहे.
राज्यात कधी?
- जूनच्या पहिल्या आठवड्याअखेरीस मान्सून केरळात. - १४ जूनला महाराष्ट्रात येण्याची शक्यता.- १६ ते २२ जून दरम्यान राज्य व्यापण्याची शक्यता.
उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती
८ जूनपर्यंत विविध जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती जाणवू शकते. ७ जूनच्या चक्रीवादळाचा प्रभाव तीन दिवस असेल.
आज येथे पाऊस?
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि भंडारा.