नवी दिल्ली : रेल्वेगाड्यांमध्ये रिकाम्या असलेल्या आसनांचे आरक्षण तक्ता तयार झाल्यानंतर आरक्षण करणाऱ्या प्रवाशंना भाड्यात १० टक्के सवलत देण्याची योजना रेल्वे मंत्रालय येत्या १ जानेवारीपासून सर्व गाड्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करणार आहे.या महिन्याच्या सुरुवातीस रेल्वेने अशी प्रायोगिक योजना शताब्दी, दुरान्तो आणि राजधानी या गाड्यांसाठी सुरू केली होती. आता १ जानेवारीपासून सर्व गाड्यांमधील सर्व वर्गांमधील आरक्षित आसनांसाठी ही योजना सहा महिन्यांसाठी लागू करण्यात येणार असल्याचे परिपत्रक रेल्वे मंत्रालयाने जारी केले आहे.सर्वसाधारणपणे गाडी सुटण्याच्या चार तास आधी त्या गाडीतील आरक्षणाचा चार्ट तयार केला जातो. असा चार्ट तयार झाल्यानंतर,गाडीत रिकाम्या असलेल्या जागांसाठी कोणी अरक्षण केल्यास त्यावर संबंधित वर्गाच्या विकल्या गेलेल्या शेवटच्या तिकिटाच्या भाड्यात १० टक्के सवलत दिली जाईल.यात पारदर्शकता राहावी यासाठी संबंधित वर्गा तील सर्वात शेवटच्या विकल्या गेलेल्या तिकिटाच्या भाड्याची रक्कमही आरक्षण चार्टवर छापली जाईल. तसेच आरक्षण करूनही जे प्रवासी येणार नाहीत त्यांची आसनेही या योजनेसाठी उपलब्ध होतील, असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.याआधी रेल्वेने शताब्दी, दुरान्तो व राजधानी या गाड्यांसाठी ‘फ्लेक्झी फेअर’ नावाची विविध दराने भाडे आकारण्याची योजना सुरू होती. त्यात ऐनवेळी घेतल्या जाणाऱ्या तिकिटास चढ्या दराने भाडे भरावे लागत असल्याने काही मार्गांवर प्रवासीसंख्या कमी होत असल्याचे निदर्शनास आले होते. यावर मात करण्यासाठी रेल्वेने या गाड्यांसाठी वरीलप्रमाणे भाड्यात १० टक्के सवलत सुरू केली होती. तीच आता सर्व गाड्यांनाही लागू करण्यात येत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
ऐनवेळी रेल्वे आरक्षण केल्यास १० टक्के सूट
By admin | Published: December 30, 2016 2:22 AM