लखनऊ : देशातील विविध ठिकाणांहून स्थलांतरित मजुरांना घेऊन उत्तर प्रदेश, बिहारकडे जाणाऱ्या श्रमिक विशेष रेल्वेगाड्या सुमारे १० तास उशिराने धावत असल्याच्या व त्यामुळे अन्नपाण्याविना मजुरांचे विलक्षण हाल झाल्याचे प्रकार गेल्या दोन दिवसांत घडले आहेत. त्यामुळे या मजुरांनी रेल्वेगाडीतून रूळांवर उतरून केंद्र व नीतीशकुमार सरकारचा जोरदार निषेध केला. रेल्वे यंत्रणेने शिळे अन्न खायला दिल्याच्या तक्रारीही त्यांच्यापैकी अनेकांनी केल्या आहेत.
आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथील स्थलांतरित मजुरांना घेऊन निघालेली श्रमिक विशेष रेल्वेगाडी उत्तर प्रदेशमधील दीनदयाळ उपाध्याय रेल्वे स्थानकाजवळ आली व तिथे सुमारे दहा तास थांबून राहिली. गाडी पुढे सरकत नसल्यामुळे त्यातील प्रवासी बेचैन झाले होते. त्यांच्या खाण्यापिण्याचे तर खूपच हाल झाले. घरी लवकर पोहोचायची आस या सर्वांना लागलेली होती. त्यात हे संकट उद्भवल्याने रेल्वे प्रशासनाचा निषेध करण्यासाठी काही मजूर रेल्वेरुळावर उतरले व त्यांनी जोरदार निदर्शने केली.
आंध्र प्रदेशमधून आलेल्या श्रमिक विशेष गाडीतून प्रवास करणारा एक मजूर धीरेन राय यांनी सांगितले की, ही रेल्वेगाडी शुक्रवारी रात्री अकरा वाजता दीनदयाळ उपाध्याय रेल्वे जंक्शनच्या जवळ येऊन उभी राहिली. या गाडीतून प्रवास करताना दोन दिवसांपासून आम्हाला व्यवस्थित जेवणही मिळालेले नाही. श्रमिक विशेष रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रत्येकमजुराकडून १५०० रुपये शुल्क घेण्यात आले आहे.महाराष्ट्रातील पनवेलहून उत्तर प्रदेशच्या जौनपूरला निघालेली श्रमिकविशेष रेल्वेगाडी वाराणसीजवळ १० तास थांबवून ठेवण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेले मजूर निदर्शने करण्यासाठी रेल्वे रुळांवर उतरले.
दुसºया रेल्वेगाडीने त्यांना पुढच्या प्रवासाला नेण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने दाखविली. पण त्याला या मजुरांनी नकार दिला. सरतेशेवटी रेल्वे पोलिसांनी हस्तक्षेप करत या प्रवाशांना शांत केले. त्यांना जेवायला दिले. त्यातील एक प्रवासी गोविंद कुमार राजभर यांनी सांगितले की, श्रमिक विशेष गाडीने महाराष्ट्रातून निघालो तेव्हा आम्हाला जेवण देण्यात आले होते. पण उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करताच आमचे अन्नपाण्यावाचून हाल झाले. वाराणसी येथे श्रमिक विशेष गाडी सात तास थांबविण्यात आली. मग गाडी आणखी पुढे नेऊन अजून अडीच ते पावणेतीन तास थांबविली गेली. गुजरातमधून बिहारकडे निघालेल्या श्रमिक विशेष रेल्वेगाडीतील प्रवाशांना शुक्रवारी रात्री शिळेपाके अन्न रेल्वे यंत्रणेने दिल्याचा आरोप स्थलांतरित मजुरांनी केला आहे.
उन्नावमध्ये खिडक्यांच्या काचा फोडल्या
विविध ठिकाणांहून उत्तर प्रदेश, बिहारकडे निघालेल्या श्रमिक रेल्वेगाड्यांच्या प्रसाधनगृहांमध्ये पाणी नव्हते. पिण्याचे पाणी मिळणे तर स्वप्नवतच होते. रेल्वे यंत्रणेकडून पुरविण्यात आलेल्या जेवणातील पुºया शिळ्या होत्या. दोन-तीन दिवसांपूर्वी या पुºया तळल्या असाव्यात असा त्यांचा थाट होता. बंगळुरू येथून बिहारमध्ये श्रमिक विशेष रेल्वेगाडीने चाललेल्या मजुरांनी जेवण न मिळाल्यामुळे संतापून उन्नाव रेल्वे स्थानकाच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत १८.२४ लाख मजूर आपल्या राज्यात परतले आहेत, असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले.